Satara: फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून ओळख वाढवल्यानंतर भेटायला बोलवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एका महिलेसह तिघांना अटक

यातच फेसबूक (Facebook) आणि व्हॉट्सअॅपच्या (Whatsapp) माध्यमातून ओळख वाढवल्यानंतर भेटायला बोलवून लोकांची लूट केली जात असल्याची माहिती समोर आली होती.

Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत असल्याचे अनेक बातम्या आपल्या कानावर पडत आहेत. यातच फेसबूक (Facebook) आणि व्हॉट्सअॅपच्या (Whatsapp) माध्यमातून ओळख वाढवल्यानंतर भेटायला बोलवून लोकांची लूट केली जात असल्याची माहिती समोर आली होती. या टोळीचा सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह 3 जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच सातारा पोलिसांकडून नागरिकांना सावध राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

काजल प्रदिप मुळेकर (वय 28, थेऊर सध्या रा. सिंदवणेरोड, उरळीकांचन ता. हवेली) अजिंक्य रावसाहेब नाळे (वय, 23) वैभव प्रकाश नाळे (वय, 28) अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेजण फेसबूक, व्हॉट्सअॅपद्वारे एका व्यक्तीस भेटायला बोलवायचे. त्यानंतर त्यास अन्य साथीदारांच्या मदतीने मारहाण, दमदाटी करायचे. तसेच फोटो, व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देवून लुटमार कारायचे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्यानंतर पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केला. मात्र, अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यास सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले आहे. हे देखील वाचा- Nagpur: काळी जादू! पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत एका तरूणीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. कोरोना काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे प्रत्येक नागरिकांनी अधिक सावधानी बाळगण्याची गरज आहे.