'सेनेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात करूनही, तळागाळातील शिवसैनिक अजूनही पक्षासोबत'- Aaditya Thackeray

पुरुष आणि महिला जे राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार आहेत. ज्यांना पक्ष सोडण्यात आनंद आहे, त्यांनी नव्याने निवडणुकांना सामोरे जाण्याची हिंमत दाखवली पाहिजे.'

Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. शिवसेनेशी (Shiv Sena) फारकत घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली व आता ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अशात महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी रविवारी दावा केला की, पक्षाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याकडून ‘विश्वासघात’ होऊनही तळागाळातील शिवसेना कार्यकर्ते पक्षासोबतच आहेत. मुंबईच्या उत्तर उपनगर दहिसरमध्ये आदित्य ठाकरे बोलत होते.

ते म्हणाले, ‘ज्यांना सेनेला सोडायचे होते ते गेले आहेत, पण तळागाळातील शिवसैनिक त्यांचे वडील उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पाठिंबा देत आहेत.’ गेल्या महिन्यात, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेच्या बहुसंख्य आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड केले आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संबंध तोडण्यास सांगितले. पक्षातील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ‘प्रत्येक मतदारसंघात, आमच्याकडे दोन ते तीन बलाढ्य शिवसैनिक आहेत... पुरुष आणि महिला जे राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार आहेत. ज्यांना पक्ष सोडण्यात आनंद आहे, त्यांनी नव्याने निवडणुकांना सामोरे जाण्याची हिंमत दाखवली पाहिजे. या सोबतच 'मातोश्री' (ठाकरे यांचे उपनगरातील वांद्रे येथील खाजगी निवासस्थान) ची दारे परत येऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी खुली आहेत.’ (हेही वाचा: Aditya Thackeray on CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जर आमच्यावर राग असेल तर तो राग त्यांनी मुंबईवर काढू नये : आदित्य ठाकरे)

30 जून रोजी शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंडानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांनी वारंवार शिवसेना आपली असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, काल पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘शिवसेना-भाजप युतीचे हे मजबूत सरकार आहे. एकीकडे 164 आमदार आहेत आणि समोर 99 आहेत. 164 बहुमताचे हे सरकार आहे. त्यामुळे, लोकांनी त्यांची कामे आणि समस्या घेऊन आमच्याकडे यावे. आम्ही लोकांच्या हिताची काम करण्यासाठीच हे सरकार स्थापन केले आहे.’