Mumbai Murder Case: पत्नीसोबत भांडण झाल्याने संतापलेल्या पित्याने केली 6 वर्षाच्या मुलाची हत्या; मालाडमधील धक्कादायक घटना
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदन अधिकारी याने पत्नी सुनीतासोबत झालेल्या भांडणानंतर मुलगा लक्ष्य याची हत्या केली.
Mumbai Murder Case: मुंबईतील मालाड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पित्याने आपल्या 6 वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. या संदर्भात मालवणी पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पत्नीसोबत किरकोळ वाद झाल्यानंतर संतापलेल्या तरुणाने आपल्या मुलाचा गळा चिरून निर्दयीपणे खून केला. हत्येनंतर आरोपी वडील फरार झाले. पत्नी घरी नसताना ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदन अधिकारी हे त्यांची पत्नी सुनीता, मुलगा लक्ष्य (वय, 6) आणि 13 वर्षीय मुलीसोबत मुंबईतील मालाड परिसरात राहतात. नंदन हा खूप रागीट स्वभावाचा आहे, त्यामुळे त्याचे पत्नीसोबत दररोज वाद होतात. शुक्रवारी रात्रीही पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. सकाळी सुनीता आपल्या मुलीला घेऊन शाळेत सोडण्यासाठी गेली. मुलीला शाळेत सोडल्यानंतर ती घरी परतली तेव्हा तिचा 6 वर्षांचा मुलगा लक्ष्य याचा रक्ताने माखलेला मृतदेह जमिनीवर पडला होता. (हेही वाचा - Carnac Bridge Mumbai: मुंबईतील ब्रिटीशकालीन कर्नाक पुल पाडण्यास मध्यरात्री सुरुवात, पहा व्हिडीओ)
पित्याने मुलाचा गळा चिरून केला खून -
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदन अधिकारी याने पत्नी सुनीतासोबत झालेल्या भांडणानंतर मुलगा लक्ष्य याची हत्या केली. पत्नी घरी नसताना ही घटना घडली. धारदार वस्तूने गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी पत्नीच्या जबाबाच्या आधारे आयपीसी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी वडील नंदन अधिकारी याला अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, आरोपी वडिलांनी पोलिस चौकशीत सांगितले की, त्याचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले होते, त्यानंतर रागाच्या भरात त्याने हा प्रकार केला. दोघांमध्ये रोज वाद होत असे, असेही आरोपीने पोलिसांना सांगितले.