Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील घर ईडीकडून जप्त
मुंबईतील वरळी परिसरात सीजे हाऊस इमारतीमधील चौथ्या मजल्यावर असलेले घर ईडीने जप्त केल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचे निवासस्थान अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) म्हणजेच ईडीने (ED) जप्त केले आहे. मुंबईतील वरळी परिसरात सीजे हाऊस इमारतीमधील चौथ्या मजल्यावर असलेले घर ईडीने जप्त केल्याची माहिती आहे. इकबाल मिरची (Iqbal Mirchi) प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. याच इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर असलेली पटेल यांची मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल हे ईडीच्या रडारवर आल्याचे दिसते.
प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते अतिशय निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रफुल्ल पटेल यांच्या शरद पवार यांच्यानंतर अतिशय महत्त्व असते. सध्या ते राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार आहेत. युपीएचे सरकार सत्तेत होते तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते विमानोड्डाण मंत्रीही होते.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ईडी भाजपच्या ईशाऱ्यावर काम करते आहे. केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन भाजप अशा प्रकारच्या कारवाया करत आहे. भाजप प्रामुख्याने महाविकासआघाडीला आणि त्यातही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लक्ष्य करते आहे. भाजप नेता मोहीत कंबोज यांनी नुकतेच एक ट्विट केले होते. एक संजय गेला आता दुसराही जाणार असे त्या ट्विटमध्ये म्हटले होते. भाजपच्या लोकांना हे आगोदरच कसे कळते? असा सवाल विचारतानाच महाराष्ट्र पाहतो आहे. भाजपचे हे वर्तन जनता स्वीकारणार नाही, असेही अमोल मिटकरी म्हणाले.