एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा; राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता
2008 साली निलंबित झालेले प्रदीप शर्मा 2017 साली पुन्हा सेवेत रूजू झाले मात्र आता त्यांनी राजीनामा दिला असून ते राजकारणात प्रवेश करून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे
मुंबई पोलिस खात्यातील एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2008 साली निलंबित झालेले प्रदीप शर्मा 2017 साली पुन्हा सेवेत रूजू झाले मात्र आता त्यांनी राजीनामा दिला असून ते राजकारणात प्रवेश करून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. 90 च्या दशकात गुन्हेगारी टोळ्यांचा खातमा करण्यासाठी प्रदीप शर्मा यांनी मोठ्या प्रमाणात एन्काऊंटर केल्याचंही म्हटलं जात आहे. प्रदीप शर्मा यांनी 1983 साली पोलिस दलात सहभागी झाले होते.
प्रदीप शर्मा यांच्या नावावर 100 पेक्षा अधिक एन्काऊंटर आहेत. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध या आरोपांमुळे2008 मध्ये शर्मा यांना निलंबित करण्यात आलं होतं. लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्यासह 13 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2013 साली मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची आरोपातून मुक्तता करण्यात आली. तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांमधूनही त्यांची मुक्तता करण्यात आली. 4 जुलै दिवशी त्यांनी राजीनामा दिला असून तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही.
सध्या प्रदीप शर्मा ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकात वरिष्ठ निरिक्षक या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी देखील प्रशासकीय सेवेतून निवृत्त घेत राजकारणामध्ये प्रवेश केला आहे.