CM Eknath Shinde On Onion Price: कांद्याच्या वाढत्या किमतीवर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली चिंता; साठेबाजी करणाऱ्यांवर दिले कडक कारवाईचे निर्देश

कांद्याच्या वाढत्या किमतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंता व्यक्त केली असून पणन आणि अन्न नागरी पुरवठा विभागांना व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

CM Eknath Shinde On Onion Price (फोटो सौजन्य - ANI)

CM Eknath Shinde On Onion Price: गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याच्या किमती (Onion Price) वाढल्या आहेत. स्वयंपाकघरात कांदाच्या वापर करणं सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारं होतं आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चिंता व्यक्त केली असून पणन आणि अन्न नागरी पुरवठा विभागांना व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कांद्याची किरकोळ किंमत प्रति किलो 60 रुपये असावी. मात्र, मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये भाव 100 रुपये किलोवर पोहोचले आहेत.

कांद्याच्या वाढत्या किमतीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'सरकारने छोट्या आणि मोठ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठा मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, काही व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत.' एकनाथ शिंदे यांनी अत्यावश्यक वस्तू कायदा आणि काळाबाजार प्रतिबंध आणि जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा या कायद्यांतर्गत अशा व्यापाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा -Onion Price Rise: कांद्याच्या किमतीत वाढ, ग्राहकांचे हाल; कसे आहेत दर? जाणून घ्या)

एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना त्यांच्या स्थानिक भागात जास्त कांद्याचा साठा असल्याची प्रकरणे अन्न पुरवठा कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात कळवावीत, असे आवाहन केले आहे. सरकारने कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमासाठी सरकारने 851.67 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली असल्याचंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. (हेही वाचा - Onion Prices: दिल्ली, मुंबईसह देशभरात कांद्याचे दर गगनाला भिडले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले)

केंद्र सरकारकडे साडेपाच लाख टन कांदा -

कांद्याच्या वाढत्या किमती पाहता केंद्र सरकारने यावर्षी 4.7 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक तयार केला आहे. यातून दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये कांदा पाठवला जात आहे. आतापर्यंत बफर स्टॉकमधून कांदा गुजरात, कर्नाटक, गोवा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि मणिपूर येथे पाठवण्यात आला आहे. बफर स्टॉकसाठी खरेदी केलेल्या कांद्याची सरासरी खरेदी किंमत 28 रुपये प्रति किलो आहे.