Eknath Shinde हे केवळ सहीपुरते मंत्री उरलेत,'मातोश्री'ला विचारून घ्यावे लागतात निर्णय; वसई मध्ये जन आशीर्वाद यात्रे दरम्यान Narayan Rane यांचा दावा

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले असून मातोश्रीवर विचारुनच त्यांना सर्व निर्णय घ्यावे लागतात असा दावा खासदार नारायण राणेंनी केला आहे.

Eknath Shinde (Photo Credits: IANS)

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांची मुंबई मध्ये नुकतीच जनआशिर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) पार पडली आहे. दरम्यान काल वसई (Vasai) मध्ये पत्रकारांशी बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर हल्लबोल कायम ठेवला आहे. याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत कंटाळले असून मातोश्रीवर विचारुनच त्यांना सर्व निर्णय घ्यावे लागतात असा दावा केला आहे. एकनाथ शिंदे या प्रकाराला कंटाळले आहेत त्यांचा लवकरच निर्णय होईल, आमच्यात आले तर घेऊन टाकू असं खळबळजनक वक्तव्य केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला लागली आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंनी या प्रकारावर उत्तर देणं टाळलं आहे. Jan Ashirwad Yatra: दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण, नारायण राणे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया.

नारायण राणे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची देखील ‘चिरंजीव मंत्री’ म्हणून खिल्ली उडवली आहे. एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री उरले आहेत असंही ते म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी नारायण राणे दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी पार्क वर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. शिवसेनेकडून राणेंना रोखण्यात आले नाही पण त्या संध्याकाळी स्मृतिस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण करण्यात आलं.

दरम्यान मुंबईत पार पडलेल्या भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान कोविड 19 नियमावलीचं उल्लंघन झाल्याचं सांगत मुंबई पोलिसांनी 36 गुन्हे दाखल केले आहेत.