Eknath Khadse Likely to Leave BJP: एकनाथ खडसे सोडणार कमळाची साथ? पण भाजप सोडून जाणार कोठे? राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना?

परंतू, एकनथ खडसे यांनी गेल्या काही काळात केलेली जाहीर विधाने आणि पक्षात त्यांची झालेली अवस्था पाहता ते पक्षांतर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Eknath Khadse Likely to Leave BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार अशी ओळख असलेले ज्येष्ठ भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) गेले काही काळ नाराज आहेत. पक्षात डावलले जात असल्याची भावना त्यांनी अनेकदा जाहीर बोलून दाखवली आहे. याचीच पुढची परिणीती खडसे भाजप सोडण्यात होण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांनी अद्याप तरी आपले पत्ते उघडे केले नाहीत. त्यामुळे पक्षांतर करु पाहणारे खडसे नेमके कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता आहे. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा असतानाच ते शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करतील अशीही चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे खडसे शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीत याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे भाजप सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच दिली. परंतू, एकनथ खडसे यांनी गेल्या काही काळात केलेली जाहीर विधाने आणि पक्षात त्यांची झालेली अवस्था पाहता ते पक्षांतर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून पाठवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. एकनाथ खडसे हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांतून झळकले होते. परंतू, अशा कोणत्याही भेटीचे वृत्त शरद पवार आणि आणि एकनाथ खडसे अशा दोघांकडूनही फेटाळण्यात आले होते. त्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाबाबतच्या कथीत चर्चांबाबत येणाऱ्या काळातच खुलासा होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Governor’s Quota: राज्यपाल कोठ्यातून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या 'या' चेहऱ्यांना मिळू शकते विधानपरिषदेवर संधी)

दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खडसे यांच्या पक्षांतराबाबतचा सस्पेंन्स आणखी वाढला आहे. नगर येथे बोलताना अर्जुन खोतकर यांनी म्हटले की, एकनाथ खडसे हे भाजपमधून जवळपास बाजूला पडले आहेत. त्यामुळे आता फक्त त्यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त बाकी राहिला आहे. प्रश्न इतकाच आहे की त्यांना आता इकडे यायचे का तिकडे जायचे इतकेच त्यांना ठरवायचे आहे. खोतकर यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.