ED's Action Against Anil Parab: शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

साई रिसॉर्ट एनएक्सच्या बेकायदा बांधकामाबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अनिल परब | (File Photo)

अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अनिल परब, साई रिसॉर्ट एनएक्स आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात जमिनीच्या स्वरूपातील मालमत्ता जप्त केली आहे. ही जमीन रत्नागिरीतील दापोली-मुरुड येथील गट क्रमांक 446 मध्ये आहे, जी एकूण 42 गुंठा असल्याचे सांगितले जात आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने अनिल दत्तात्रेय परब यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने पीएमएलए अंतर्गत तपास सुरू केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, पीएमएलएच्या तपासात सदानंद कदम यांच्यासह अनिल परब यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

या दोघांनी स्थानिक एसडीओ कार्यालयाकडून जमिनीचा वापर शेतीतून बिगरशेती प्रयोजनात रूपांतरित करण्यासाठी आणि सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधण्यासाठी बेकायदेशीर परवानगी मिळवली. आता इडीने साई रिसॉर्टशी संबंधित 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केल्याची माहिती मिळतेय. यात साई रिसॉर्टसह अन्य ठिकाणच्या मालमत्तेचा समावेश आहे. परब हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे तीन वेळा शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी राज्यात परिवहन आणि संसदीय कामकाजाची खाती सांभाळली आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीने कुर्क केलेल्या जमिनीची किंमत 2,73,91,000 रुपये आहे, तर ज्या जागेवर साई रिसॉर्ट एनएक्स बांधले गेले आहे त्याची किंमत 7,46,47,000 रुपये आहे. साई रिसॉर्ट एनएक्सच्या बेकायदा बांधकामाबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. परब यांच्यावरील कारवाईच्या संदर्भात, अंमलबजावणी संचालनालयाने 14 ठिकाणी छापे टाकले. 2022 मध्ये ईडीने अनिल परब यांच्याविरोधात अनेकदा समन्स बजावले होते व त्यांची अनेक तास चौकशी केली होती. (हेही वाचा: दीपक केसरकरांना संजय राऊतांचं 'पुन्हा तुरूंगात जाण्यावरून' प्रत्युत्तर; पहा ट्वीट करत पुन्हा दाखवला ठाकरी बाणा)

दरम्यान, परब यांच्यावर कथित मनी लाँड्रिंगशिवाय अनेक आरोप होते. परब यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून माजी खासदारावर 100 कोटींचा मानहानीचा दावा केला होता. परब यांनी परिवहन विभागात बदलीचे रॅकेट चालवल्याचा आरोपही सोमय्या यांनी जाहीरपणे केला होता.