Existing Politics in Maharashtra: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे पडसाद, मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिष्टमंडळ सूरतला रवाना; NCP, काँग्रेसमध्ये बैठकांचा धडाका

परिणामी शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात बैठकांचा धडाका उडाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या काय सुरु आहे, याबाबत या ठळक घडामोडी.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नॉट रिचेबल होत थेट सूरत गाठल्यामुळे महाविकासआघाडी ( Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये मोठाच गदारोळ उडाला आहे. खास करुन शिवसेनेमध्ये मोठे पडसाद उमठत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याचीच माहिती नसल्याने परिस्थितीचा अद्यापही पुरेसा अंदाज येत नाही. दरम्यान, राज्याच्या राजकारणामध्ये मात्र राजकीय वादळ जोरदार आले आहे. परिणामी शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात बैठकांचा धडाका उडाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या काय सुरु आहे, याबाबत या ठळक घडामोडी.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळ सूरतला रवाना

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एक शिष्टमंडळ सूरतला रवाना झाले आहे. या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवी फाटक यांचा समावेश असल्याचे समजते. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई कामी येणार का याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Existing politics in Maharashtra: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात पडसाद, केंद्रीय मंत्री अमित शाह भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता)

राष्ट्रवादीची बैठक

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एक बैठक विधिंडळ परिसरात पार पडत आहे. राष्ट्रवादीचे इतर नेतेही मुंबईला मुंबईकडे निघाले असल्याचे वृत्त आहे. दिल्ली येथील एक बैठक आटोपून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील मुंबईला रवाना होतील असे सांगितले जात आहे.

काँग्रेसमध्येही मंथन

शिवसेनेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसही सावध झाली आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांची एक बैठक मुंबईत आयोजित केली आहे. मात्र काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेतील पक्षांतर्गत घडामोडींबाबत जाहीर भाष्य करणे टाळले आहे. विधानपरिषद निवडणुकीत आम्ही आमचा पराभव का झाला याबाबत विचार करतो आहोत. मात्र, गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करण्यास आम्ही तयार आहोत, असेही काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.