E-Shivneri Bus: आता मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर धावणार 100 इलेक्ट्रिक बसेस; CM Eknath Shinde यांच्या हस्ते झाला शुभारंभ
एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ, सुंदर बसस्थानक असावे ही प्रवाशांची अपेक्षा आहे.
आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे (E-Shivneri Bus) लोकार्पण, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठिशी असेल. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सध्या मुंबई–ठाणे-पुणे अशा 100 शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटी देखील अमृत महोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी कच्च्या रस्त्यांवर पण एसटी पोहचायची. आता सगळ्या ठिकाणी रस्ते झाले आहेत मात्र एसटी अजूनही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटीची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी कारण एसटीला परंपरा आहे. नवीन संकल्पना, बदल घडताहेत. प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. प्रवाशांच्या एसटीकडून अपेक्षा आहेत.
एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ, सुंदर बसस्थानक असावे ही प्रवाशांची अपेक्षा आहे. (हेही वाचा: राज्यातील 317 तालुक्यांच्या ठिकाणी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू'; सुमारे 30 चाचण्या होणार मोफत)
यावेळी प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले की, कोविडसारख्या काळातही एसटी महामंडळाने कामगिरी पार पाडली आहे. गेल्या एप्रिलमध्ये एसटीचे 3 लाख प्रवासी होते, आता 54 लाख प्रवासी झाले आहेत. लाखो ज्येष्ठ नागरिक एसटीत मोफत प्रवास करतात तसेच महिलांना 50 टक्के प्रवास सवलत देण्यात येते त्यामुळे दररोज एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या 10 लाख झाली आहे.