Drunk and Driving Cases: 'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची प्रकरणे रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये; रस्ते, चौक, नाक्या-नाक्यांवर होणार वाहनचालकांची तपासणी

महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

Driving (Photo Credit : Pixabay)

Drunk and Driving Cases: पुणे आणि मुंबईमधील ड्रंक अँड ड्राईव्ह (Drunk and Driving) अपघात प्रकरणांमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. आजच मुंबईतील वरळी कार अपघातातील आरोपी मिहीर शाहचे वडील राजेश शहा यांना जामीन मिळाला आहे. आता मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून, यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाई करण्याच्या  सूचनाही मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आल्या आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळेस तसेच विकेंड दिवशी तापासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई आणि दंडाची वसूली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा हॅबिच्युअल वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे.

मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्ज, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमीत तपासणी करावी. पब्ज, बार, रेस्टारंट चालू ठेवण्याच्या वेळा, ध्वनी प्रदुषणाचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात. रात्री उशीरा चालू राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. (हेही वाचा: Rajesh Shah Granted Bail: मुंबई बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणात अटकेत असलेल्या शिवसेना नेत्याला जामीन मंजूर)

मद्यप्राशन करुन वाहने चालविण्याने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी. लोकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधीत प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.