Lalit Patil Drug Case: ललित पाटील सह त्याच्या 12 साथीदारांवर MCOCA; विशेष कोर्टात चालणार खटला
ससून हॉस्पिटल मध्ये ललितला पोलिसांनी बेदम मारल्याचा दावा केला आहे.
ड्र्ग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याच्या सह त्याच्या 12 साथीदारांवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबत पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. ललित अंमली पदार्थ विकून सोनं खरेदी करत होता. त्याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत एकूण 8 किलो सोनं जप्त केले आहे. नाशिक मध्ये ललित पाटील ड्रग्स बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यासाठी त्याची टीम देखील होती. अरविंदकुमार लोहरे आणि ललित पाटील हे टोळी प्रमुख होते. लोहरे हा एमडी बनवण्यात माहिर आहे.
पुणे पोलिसांची एक टीम काल (2 नोव्हेंबर) ललित पाटीलला घेऊन नाशिकला गेली होती. त्यांनी ललितने एका व्यक्तीकडे ठेवायला दिलेले सोने जप्त केले आहे. सात नोव्हेंबर पर्यंत ललित पाटीलला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्र्ग्सच्या प्रकरणामध्ये तपासासाठी पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा ताबा मुंबई पोलिसांकडून घेतला. आता मोक्का लागल्यानंतर याप्रकरणी खटला विशेष न्यायालयामध्ये चालवला जाणार आहे.
मोक्का म्हणजे काय?
‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’म्हणजे मोक्का कायदा. 1999 मध्ये 'टाडा' च्या धर्तीवर मोक्का कायदा आणण्यात आला. प्रामुख्याने या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करून गुन्हेगारी क्षेत्रातील 'टोळी' चा बिमोड केला जातो. या कायद्यामध्ये आरोपीला लवकर जामीन मिळत नसल्याने त्याचं बाहेर असलेलं जाळ कमजोर होतं. मोक्का कायद्याअंतर्गत पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत वाढवून दिली जाऊ शकते. तोपर्यंत मोक्काअंतर्गत आरोपींना जामीन मिळत नाही. आरोपीविरुद्ध पोलिसांना ठोस पुरावा सादर करता न आल्यास त्यानंतर जामीन मिळतो. परंतु बऱ्याचवेळा वर्षभरही आरोपींना जामीन मंजूर होत नाही. दोषींना जन्मठेप आणि पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. Lalit Patil Drugs Case: 'पळालो नाही, पळवण्यात आलं'; ललित पाटीलचा मीडियासमोर खळबळजनक दावा .
दरम्यान ललित पाटीलच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, पुणे पोलिसांकडून त्याच्या जीवाला धोका आहे. ससून हॉस्पिटल मध्ये ललितला पोलिसांनी बेदम मारल्याचा दावा केला आहे. त्याच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं वकिलांचं मत आहे. तसेच ललित पाटीलने कोणतेही अंमली पदार्थ तयार केले नसल्याचा त्याच्या वकिलांचा न्यायालयात दावा केला होता.