गडकिल्ल्यांवर दारू प्याल तर खबरदार! 10 हजारांच्या दंडासोबत होणार 6 महिने तुरुंगावास
सध्या या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबले जातात. मात्र अलीकडच्या काळात गडकिल्ल्यांवर ट्रेक करण्याचे प्रमाण वाढले आहे.
महाराष्ट्रातील गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाची नेहमीच आठवण करुन देतात. सध्या या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबले जातात. मात्र अलीकडच्या काळात गडकिल्ल्यांवर ट्रेक करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु पर्यटनाच्या नावाखाली गडकिल्ल्यांवर येणाऱ्या काही लोकांकडून तेथे गैरवर्तवणूक केली जात असल्याचे प्रकार ही समोर आले आहेत. त्यामधील खासकरुन गडकिल्ल्यांवर दारु पिण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आणले आहेत. त्यामुळे आता जर तुम्ही गडकिल्ल्यांवर दारु प्यायलात तर कडक शिक्षा होणारच आहे. त्याचसोबत 6 महिन्यांच्या तुरुंगवासासोबत 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
राज्याच्या गृहविभागाकडून गडकिल्ल्यांवर दारु पिताना आढळल्यास शिक्षा करण्यात येईल हा निर्णय घेतला आहे. कारण काही जण गडकिल्ल्यांना पिकनिक स्पॉटचे नाव देऊन तेथे बेशिस्त पद्धतीने वागणूक करतात. एवढेच नाही तर दारु पिऊन तेथे धिंगाणा घातल्याचे प्रकार ही उघडकीस आणले आहेत. तर जानेवारी महिन्यात गडकिल्ल्यांवर दारु पिणाऱ्या एका ग्रुपला चोप देण्यात आला होता. गडकिल्ल्यांचे पावित्र्य नेहमीच राखावे असे वारंवार सांगून सुद्धा तेथे गैरवर्तवणूक केलीच जाते. मात्र आता या नव्या नियमामुळे अशा गोष्टींना चाप बसणार हे नक्की.(माथेरान: पेब किल्ल्यावर दारू पार्टी करणा-या मुंबईतील 11 तरुणांचे कपडे काढून शिवभक्तांनी दिला चोप, व्हिडिओ व्हायरल)
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 85 अंतर्गत गडकिल्ल्यांवर दारु प्यायल्यास शिक्षा केली जाणार आहे. तसेच शिक्षा झाल्यानंतर पुन्हा तशी वर्तवणूक केल्यास शिक्षेत वाढ केली जाणार असून 1 वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागणार आहे. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दारुड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शिक्षेसंबंधित सूचना सुद्धा किल्ल्यांवर लावण्यात येणार आहे.