Mumbai Airport: मुंबई विमानतळावर 80 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; एकास अटक
त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आढळून आले.
महसूल गुप्तचर संचालनालय अर्थातच डीआरआयने (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आढळून आले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, विमानतळावर बुधवारी एका संशयीत प्रवाशाला संशयावरुन रोखण्यात आले. या वेळी त्याच्या सामनानाची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार या प्रवाशाकडे तब्बल 16 किलो हेरॉइन सापडले. बाजारात या हेरॉइनची किंमत अंदाजे 80 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
डीआरआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, हेरॉईन एका ट्रॉली बॅगमध्ये तयार केलेल्या पोकळीत लपवले होते. केरळचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीवर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने माहितीत म्हटले आहे. (हेही वाचा, मुकेश अंबानी कुटुंबीयांना पुन्हा धोका; Antilia आणि Reliance Hospital बॉम्बने उडवण्याची धमकी)
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव जॉन असल्याचे समजते. त्याने डीआरआयला सांगितले की एका परदेशी नागरिकाने त्याला भारतात ड्रग्ज नेण्यासाठी कमिशन म्हणून एक हजार अमेरिकन डॉलर्स दिले होते.आरोपीने इतर साथीदारांची नावेही उघड केली असल्याचे एएनआयने म्हटले आहे. आरोपीने सांगितलेल्या नावांबाबत डीआरआय चौकशी करत आहे. याआधीही भारतात ड्रग्जच्या तस्करीत जॉनचा सहभाग होता का, याचाही शोध आता डीआरआय घेत आहे.