
पुण्यातील एका आघाडीच्या खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या कथित किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी आ (29 मे) ससून जनरल हॉस्पिटलचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) यांना अटक केल्यची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणी नगरमध्ये पोर्श कारने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांच्या मृत्यू प्रकरणात मागील वर्षी 17 वर्षीय मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर तावरे सध्या पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. पुण्यातील एक आघाडीचे खाजगी रुग्णालय असलेल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये 2022 मध्ये झालेल्या किडनी प्रत्यारोपण रॅकेटप्रकरणी शहर गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. "आम्ही किडनी रॅकेट प्रकरणात डॉ. अजय तावरे यांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांना आज न्यायालयात हजर केले जाईल," असे पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी मीडीयाशी बोलताना सांगितले.
2022 मध्ये, तावरे हे किडनी प्रत्यारोपणाला मान्यता देणाऱ्या प्रादेशिक अधिकृतता समितीचे प्रमुख होते. मे 2022 मध्ये, पुणे पोलिसांनी त्याच वर्षी मार्चमध्ये किडनी प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.(हेही वाचा, Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, 2 डॉक्टरांना अटक ).
कोल्हापूरमधील एका महिलेला 15 लाख रुपयांचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे. तिने 2022 मध्ये प्रत्यारोपणाची गरज असलेल्या एका पुरूषाची पत्नी असल्याचे भासवून फसवणूक केली आणि एका तरुणीला तिची किडनी दान केली. त्या तरुणीच्या आईनेही तिची किडनी त्या पुरूषाला दान केली. रक्तगट जुळत नसल्याने रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांकडून किडनी मिळू शकत नाही तेव्हा दोन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये अशी अदलाबदल केली जाते. 29 मार्च 2022 ला रुबी हॉल क्लिनिकमध्ये प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर चार दिवसांनी, पैशांवरून वाद झाल्यानंतर महिलेने तिची खरी ओळख उघड केली.