डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग जोडणारा कोपर उड्डाणपुलावर आजपासून जड वाहनांसाठी प्रवेशबंदी
त्यानुसार, आजपासून या पुलावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून अन्य वाहनांसाठी हा पुल सुरु राहिल असे महापालिकेने सांगितले आहे.
मे महिन्यामध्ये रेल्वेने डोंबिवली (Dombivali) पूर्व मधील कोपर उड्डाणपुल धोकादायक असल्याचे महापालिकेने घोषित केले. त्यानंतर हा पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्याबाबतीत हालचालींना वेग आला होता. मात्र लोकप्रतिनिधींना निर्णयाला विरोध केल्याने आता हा पुल केवळ अवजड वाहनांकरता बंद करण्यात आला आहे. आजपासून या पुलावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून अन्य वाहनांसाठी हा पुल सुरु राहिल असे महापालिकेने सांगितले आहे.
मुसळधार पावसामुळे पुलाच्या भिंतींवर होणारा पाण्याचा निचरा विचारात घेऊन धोकादायक स्थितीत असलेल्या या पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. हा विचार करून रेल्वेने अवजड वाहनांना हा पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक विभागाने तशी अधिसूचना जाहीर केली आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
कोपर पुलासंदर्भात पवई ‘आयआयटी’मधील तज्ज्ञांनी रेल्वे प्रशासनाला अहवाल दिला आहे. या अहवालातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून या पुलाची अत्यंत महत्त्वाची व तातडीच्या दुरुस्तीची कामे रेल्वेने करावीत. पुलावरील रस्ता व इतर दुरुस्तीची कामे पालिकेने करावीत, असा निर्णय घेण्यात आला. कोपर पुलाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत जड, अवजड वाहनांनी ठाकुर्ली उड्डाणपुलाचा वापर करावा, असे पालिकेने जाहीर केले आहे.
हा पूल अवजड वाहनांसाठी बंद झाल्याने स.वा.जोशी मार्गावर वाहतूकीची कोंडी निर्माण होणार असल्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त होतेय.