IPL Auction 2025 Live

Diwali 2023: राज्यातील आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधन वाढीसह मिळणार दिवाळी भेट, 80,000 महिलांना फायदा

आशा स्वयंसेविकांना मानधनवाढ व दिवाळी भेट देऊन आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड केली आहे.

आशा स्वयंसेविका (संग्रहित संपादित प्रतिमा)

राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये मानधन वाढ, 3 हजार 664 गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार 200 रुपये मानधन वाढ, आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी 2 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका, संघटनांचे प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत सांगितले.

राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. सद्यस्थितीत राज्यात 80 हजारावर आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी आशा सेविकांना 5 हजार रुपये मानधन देण्यात येत होते. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी मानधनात 7 हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनस्तरावरूनही 3 हजार रुपये मानधन दिले जाते.  त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता 15 हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

राज्यात 3 हजार 664 गट प्रवर्तक कार्यरत आहेत. यापूर्वी गट प्रवर्तकांना 6 हजार 200 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी आज 6 हजार 200 रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे. गट प्रवर्तकांना केंद्रशासनस्तरावरूनही 8 हजार 775 रुपये मानधन मिळत असून,  त्यांना आता 21 हजार 175 रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. (हेही वाचा: Aapla Dawakhanas: मुंबईकरांना दिलासा! शहरात सुरु होणार आणखी 250 'आपला दवाखाने')

या बैठकीत  आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना 2 हजार रुपये दिवाळी भेटही देणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्र्यांनी केली आहे. आशा स्वयंसेविकांना मानधनवाढ व दिवाळी भेट देऊन आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड केली आहे. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.