Diveagar Tragedy: आळंदीतील 'Winners Academy' अनधिकृत; संस्था सील करण्याची कारवाई होणार
रायगडमधील दिवेआगार समुद्रकिनारी आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर सहल आयोजित करणारी 'विनर्स अॅकॅडमी' अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. ही संस्था सील करून पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार असल्याचे नगर परिषदेने सांगितले.
रायगड जिल्ह्यातील दिवेआगार समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांची सहल आयोजित करणारी 'Winners Academy' ही कोचिंग संस्था अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. आळंदी नगर परिषदेकडे या संस्थेची कोणतीही अधिकृत नोंदणी नाही, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी माधव खांडेकर यांनी दिल्याचे वृत्त न्यूज 18 मराठी कडून देण्यात आले आहे.
'Winners Academy' वर कारवाईची तयारी
खांडेकर यांनी सांगितले की, 'Winners Academy' ही संस्था अनधिकृत असून ती तातडीने सील करण्यात येईल. प्रशासनाकडून याबाबत पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली जाणार आहे. संस्थेच्या निष्काळजीपणामुळे आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संबंधित चालकांवर सदोष मनुष्यवधाचा (भारतीय दंड संहिता कलम 304) गुन्हा दाखल करण्याची मागणी पूर्णपणे योग्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.
दिवेआगार दुर्घटनेमध्ये नेमकं काय झालं ?
आळंदी येथील 'विनर्स अॅकॅडमी' या कोचिंग क्लासचे अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगार येथे आले होते. गुरुवारी दुपारी हे विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. त्या वेळी समुद्राला भरती होती.
सुरुवातीला दोन विद्यार्थी खड्ड्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले आणखी पाच विद्यार्थी आणि इतर साथीदारही पाण्यात अडकले. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि नाकातोंडात पाणी गेल्याने आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
स्थानिकांचा बचावकार्यात पुढाकार
विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने समुद्राच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी 30 ते 35 विद्यार्थ्यांना वाचवले. मात्र, सात ते आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
आळंदीत शोककळा
या घटनेमुळे आळंदी शहरावर शोककळा पसरली आहे. दिवेआगार परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित अशा अनधिकृत कोचिंग क्लासेसवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.