Anil Parab on Neelam Gorhe: विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या विरोधात अपात्र याचिका दाखल- अनिल परब

त्यांनी त्यांच्या मूळ पक्षाचे सदस्यत्व सोडल्याने, तसेच त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव असल्याने त्यांना पदावरुन काम करता येणार नाही. त्यांना उपसभापतींच्या खुर्चीवर बसण्याचा नैतीक अधिकार नाही, असा आक्षेप घेण्यात आला.

Neelam Gorhe | Twitter

Disqualification Petition On Neelam Gorhe: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज (17 जुलै) पासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये हा संघर्ष झाला. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिवसेना (UBT) पक्षाच्या प्राथमीक सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सभागृहामध्ये गोऱ्हे यांना उपसभापती म्हणून काम करण्या येणार नाही, असा आक्षेप घेण्यात आला. यावर उप-सभापतींवर अशा प्रकारे आक्षेप घेता येत नाही, असे आक्रमक उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

नेमके काय घडले?

सभागृहामध्ये कामकाजाला सुरुवात झाल्यानंत शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावर आक्षेप घेतला. त्यांनी त्यांच्या मूळ पक्षाचे सदस्यत्व सोडल्याने, तसेच त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव असल्याने त्यांना पदावरुन काम करता येणार नाही. त्यांना उपसभापतींच्या खुर्चीवर बसण्याचा नैतीक अधिकार नाही, असा आक्षेप घेण्यात आला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आक्षेप घेतला. विधानसभा उपाध्यक्षा यांनी पक्षाचे सदस्यत्व सोडल्याने आणि विरोधी पक्षात प्रवेश केल्याने आम्ही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी नोटीस दिली आहे, अशी माहिती आमदार अनिल परब यांनी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. (हेही वाचा, Monsoon Session of Maharashtra Legislature: आजपासून सुरु होणार महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; जाणून घ्या विधेयकांचे स्वरूप)

विधानसभेत स्थगन प्रस्ताव फेटाळला

विधानसभा सभागृहात विरोधकांच्या वतीने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पर्जन्यमान, शेतकऱ्यांची स्थिती आणि इतर मुद्द्यांवर भागृहात स्थगन प्रस्ताव दाखल केला. मात्र, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभागृहाचा त्याग केला.

राज्य सरकार केवळ बहुमतावर कामकाज रेटत आहे. ते गुणवत्तेवर कामकाज करत नाही. राज्यातील जनतेशी त्यांना काहीही देणेघेणे उरले नाही. आज राज्यासमोर अनेक प्रश्न असताना राज्य सरकार केवळ बहुमत मिळाले म्हणून कामकाज रेटू लागले आहे, असा घणाघात विरोधकांनी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी असेल अशी चुणूक पाहायला मिळते आहे.