Maharashtra Politics: आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घेण्यासाठी ठाकरे गटाकडून नरहरी झिरवाळांना निवेदन
सध्या विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्रात नसल्याने ठाकरे गटाने आपल्या मागण्यांचं निवेदन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले आहे.
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकारणातील घटनांना वेग आले. ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल 79 पानी निवेदन देणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्व तपशील या निवेदनात समाविष्ट केला जाणार आहे. कोर्टानं जो निर्णय दिला आहे, त्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गट अध्यक्षांकडे करणार आहे. मात्र सध्या विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्रात नसल्याने ठाकरे गटाने आपल्या मागण्यांचं निवेदन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे तातडीने ठाकरे गटाचे आमदारांनी आज विधान भवन येथे जाऊन हा निर्णय तातडीने घ्यावा, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडून निवेदन दिले. अध्यक्ष अनुपस्थित असल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना हे निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर अध्यक्षांनी या संदर्भात निर्णय घ्यावा अशा मागणीचे पत्र दिल्याचं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं.
सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर आता या निकालाचे अर्थ काय, यावर चर्चा सुरू आहे. 16 आमदारांच्या अपात्रेतवर कारवाई करण्यासाठीचे अधिकार सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेबाबतची कारवाई ही रिजनेबल टाईम कालावधीत करावी असे म्हटले आहे.