Lok Sabha Election 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपची उमेदवारी मागे, महाविकास आघाडीला दिलासा

तसेच येथे महाविकास आघाडीने त्यांच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची मागणी होती.

Sharad Pawar Party Symbol | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha Election) माकपने देखील उमेदवार जाहीर केल्याने संभ्रमाची स्थिती निर्णाण झाली होती. मात्र आज येथे कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)ने या मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यासोबत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवारास माकपने सक्रिय पाठिंबा देखील दिला आहे. यामुळे मविआला मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (हेही वाचा - Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil: अमोल कोल्हेकडून थेट पुरावेच सादर करत आढळराव पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न)

माकपने जेपी गावीत यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली होती. तसेच येथे महाविकास आघाडीने त्यांच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची मागणी होती. त्यासाठी राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील 48 पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, अशी माकपची मागणी होती. मात्र, पक्षाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास दिली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जे.पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या माकपच्या राज्य सचिवमंडळाच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसेच दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने केले आहे.