Vidhansabha Election 2024: विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवार ठरले; दिलीप धोत्रे, बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी
शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना तर, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Vidhansabha Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 2 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज ठाकरे(Raj Thackearay) यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिल्यानंतर 225 उमेदवारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान सोलापूरमध्ये त्यांनी विधानसभेसाठीच्या 2 अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी शिवडीमधून बाळा नांदगावकर(Bala Nandgaonkar) यांना उमेदवारी दिली आहे. तर, पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून दिलीप धोत्रे(Dilip Dhotre) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (हेही वाचा:Raj Thackeray Marathwada Tour: विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने येत्या 4 ऑगस्टला मराठवाड्यापासून सुरु होणार राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; पहा तपशीलवार कार्यक्रम )
बाळा नांदगावकर हे मनसेचे माजी आमदार आणि गृहराज्यमंत्री देखील होते. तर पंढरपूरमधून उमेदवारी दिलेले दिलीप धोत्रे हे मनसेचे जुने आणि जाणकार नेते आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. त्या दरम्यान, त्यांनी 2 विधानसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. (हेही वाचा:वरळी पोलीस वसाहतीच्या समस्या तत्काळ दूर करत आठ दिवसांच्या आत कार्यवाही करण्याच्या सूचना; राज ठाकरेंच्या भेटी नंतर मुख्यमंत्र्याचे निर्देश )
मनसेकडून अधिकृत परिपत्रक जाहीर करत 2 उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली हे निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी पीएम मोदी आणि महायुतीला पाठिंबा दिला होता. ते महायुतीच्या अनेक सभांमध्ये दिसले. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार देखील केला होता. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ते गेले होते. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे स्वबळावर लढणार असल्यामुले महायुतीलायाचा फटका बसण्याची चिन्ह आहेत.