चुकीच्या माहितीच्या आधारावर झाली औरंगाबादच्या दीक्षा शिंदेची NASA पॅनलवर निवड; नासाच्या ईमेलमधून समोर आले धक्कादायक सत्य

अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने गुरुवारी सांगितले की, महाराष्ट्राच्या औरंगाबादमधील दहावीतील विद्यार्थिनी दिक्षा शिंदेची (Diksha Shinde) 'तिची पार्श्वभूमी आणि क्रेडेन्शियल'बाबतच्या चुकीच्या माहितीच्या आधारे नासामध्ये पॅनेलिस्ट म्हणून निवड झाली आहे

दीक्षा शिंदे (Photo Credit ANI)

अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने गुरुवारी सांगितले की, महाराष्ट्राच्या औरंगाबादमधील दहावीतील विद्यार्थिनी दीक्षा शिंदेची (Diksha Shinde) 'तिची पार्श्वभूमी आणि क्रेडेन्शियल'बाबतच्या चुकीच्या माहितीच्या आधारे नासामध्ये पॅनेलिस्ट म्हणून निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दीक्षा शिंदे या अवघ्या 14 वर्षाच्या मुलीची नासाने फेलोशिपसाठी निवड केली आहे. दीक्षा शिंदेला नासा एमएसआय फेलोशिप पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवडले गेले आहे. आता नासाने दिलेल्या नव्या माहितीमुळे खळबळ उडाली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दीक्षा शिंदे म्हणाली होती की, तिने मे 2021 मध्ये ‘We Live in Black Hole?’ यावर एक सिद्धांत लिहिला आहे. त्यानंतर तिची जून 2021 मध्ये MSI फेलोशिप व्हर्च्युअल पॅनेलसाठी पॅनेलिस्ट म्हणून निवड झाली. तिने पुढे असेही सांगितले होते की, ‘मी ऑफर स्वीकारली आहे आणि लवकरच काम सुरू करेन. माझ्या कामात संशोधकांनी सादर केलेल्या प्रस्तावांचे पुनरावलोकन करणे आणि नासासोबत संशोधन करणे समाविष्ट आहे. मी रात्री 1 ते 4 या वेळेत नासाकडे काम करणार आहे व नासा त्यासाठी मला मानधनही देणार आहे.’

मात्र दीक्षाची ही कथा प्रकाशित झाल्यानंतर तसेच याबाबत अनेक ट्वीट्स समोर आल्यानंतर, अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी दीक्षा शिंदेच्या दाव्यांमधील चुकीच्या बाबींकडे लक्ष वेधले. त्यामुळे नासाचे प्रमाणपत्र आणि शिंदे हिच्या वैज्ञानिक पेपरवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

त्यानंतर या प्रश्नांचा पाठपुरावा करताना एएनआयच्या पत्रकारांनी दीक्षाशी संपर्क साधला आणि तिच्याकडे स्पष्टीकरण मागितले. त्यावेळी शिंदे हिने तिला नासाकडून आलेले ईमेल दाखवले, ज्यात नासाचा ईमेल युआरएल (URL) 'nasa.gov' असा होता. तसेच तिने काही व्हिडीओ कॉन्फरन्सचे स्क्रीनशॉटही सादर केले ज्यामध्ये नासाचे अधिकारी असल्याचा दावा तिने केला होता. या व्यतिरिक्त, दीक्षाने ‘बँक ऑफ अमेरिका’ बँक खाते क्रमांकातून कथितपणे नासाकडून तिच्या कुटुंब सदस्याला प्राप्त झालेली रक्कमही दाखवली. यासह दीक्षा शिंदेने तिच्या 'सायंटिफिक पेपर'ची एक प्रतही दिली, मात्र ती ज्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली होती त्याची लिंक ब्रोकन होती.

दीक्षा शिंदेची बाजू ऐकून घेतल्यानंतर एएनआयचे पत्रकार नासाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. 26 ऑगस्ट रोजी, नासाच्या कॅथरीन ब्राउनने एएनआयच्या प्रश्नांना ईमेलमध्ये उत्तर दिले की, दीक्षा शिंदे हिची पॅनेलिस्ट म्हणून निवडली गेली होती. मात्र तिची निवड चुकीच्या माहितीच्या आधारावर होती. ब्राऊन पुढे म्हणाल्या की, नासाने शिंदेंचा वैज्ञानिक शोधपत्र स्वीकारला नाही. त्यांनी असेही सांगितले की, नासा सध्या संभाव्य पॅनेलिस्टच्या पार्श्वभूमीची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेत आहे व हे प्रकरण एजन्सीच्या महानिरीक्षकांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा: Diksha Shinde: औरंगाबादची कन्या दीक्षा शिंदेला मोठे यश, नासाच्या एमएसआय फेलोशिप व्हर्च्युअल पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड)

ब्राउन यांच्या मेलमधून अशीही माहिती मिळाली आहे की, शिंदे नासाकडे नोकरी करत नाही किंवा एजन्सीने तिला फेलोशिप दिली नाही. ही फेलोशिप केवळ यूएस नागरिकांसाठी उपलब्ध आहे. तर अशाप्रकारे या दीक्षाने एएनआयला दिलेली बरीच माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे. या कथेचे काही पैलू खरे असले तरी ज्या प्रकारे ती एएनआय वृत्तसंस्थेला सादर करण्यात आली ती चुकीची होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now