Dhananjay Munde On Pankaja Munde: तेव्हा त्यांनी मंत्रीपद भाड्याने दिले होते का? धनंजय मुंडे यांचा पंकजा यांच्यावर पलटवार

त्यांनी त्यांच्याच आजच्या भाषणात एक गोष्ट कबुल केली की, त्या मंत्री असताना त्यांना ऊसतोड मजुरांना न्याय देता आला नाही. मग त्या वेळी त्यांनीही त्यांचे मंत्रीपद भाड्याने दिले होते का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

Dhananjay Munde, Pankaja Munde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भगिनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. पंकजा मुंडे या देखील 5 वर्षे मुख्यमंत्री होत्या. त्यांनी त्यांच्याच आजच्या भाषणात एक गोष्ट कबुल केली की, त्या मंत्री असताना त्यांना ऊसतोड मजुरांना न्याय देता आला नाही. मग त्या वेळी त्यांनीही त्यांचे मंत्रीपद भाड्याने दिले होते का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक न्याय विभागाने नवी योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे 500 लोकसंख्या असणाऱ्या वस्तीमध्ये ग्रामपंचायतमध्ये अद्यावत संविधान भवन बांधण्यात येईल. या संविधान भवनात वाचनालयापासून अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतील, असेही धनंजय मुंडे यांनी या वेळी सांगितले.

कोरोना संकट मोठे होते. त्यातच मराठवाड्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीचे संकट आलं. शेतकऱ्यांचं नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. याबद्दल मी आघाडी सरकारचे आभार मानतो, असे धनंजय मुंडे म्हणाले. (हेही वाचा, Pankaja Munde Dasara Melava 2021: सरकार पडणार की नाही ते सोडा, जनतेसाठी काय करता ते सांगा- पंकजा मुंडे)

पंकजा मुंडे यांनी तंबाकू व्यसनमुक्तीचा संकल्प जाहीर केला. त्याबद्दल त्यांचे सामाजिक न्यायमंत्री या नात्याने मी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. व्यसनमुक्ती हा घटक माझ्याच खात्यांतर्गत येतो. महाराष्ट्र सरकारवर बोलता बोलता त्यांनी केंद्र सरकारच्या कारभाराकडेही पाहावे. केंद्राने राज्यातील अनेक नेत्यांच्या मागे ईडी लावली, सीआयडी लावली आहे. आता त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्राकडे पठपुरावा करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काही करावे, असे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच, महाराष्ट्रतल्या बाधित तमाम शेतकऱ्यांना लवकरच मावेजा आणि पीक विमा जमा होईल,असेही त्यांनी सांगितले.

व्हिडिओ

दरम्यन, ज्यांना तुम्ही येथून निवडून दिले. त्यांनी आपले मत्रीपद किरायाने (भाड्याने) दिले, अशी टीका पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरुन केली होती. पंकजा मुंडे यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले.