Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना धक्का, मंत्रिमंडळातील पहिली विकेट; अजित पवारांना 'उशीरा सूचलेले शहानपण'
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक घडामोडी नाट्यमयरित्या घडल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही नैतिक धक्का बसला आहे.
राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारला पहिला धक्का बसला आहे. राज्याचे राज्य अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणी अटक झालेला वाल्मिक कराड आणि मुंडे यांची अत्यंत जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. ज्यामुळे नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झाला होता. दरम्यान, मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे. तर, हा राजीनामा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांना 'उशीरा सूचलेले शहानपण' असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धक्का
- संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्व स्तरांतून प्रचंड दबाव होता. परंतू, विरोधक आरोप करत असतात. टीका, आरोप आणि दावे हे होतच असतात. जोपर्यंत भक्कम पुरावा येत नाही तोवर राजीनामा घ्यायचा नाही, हा फडणवीस यांचा खाक्या. 2024 ते 2019 या काळात सत्ते असताना अशा अनेक आरोप आणि विरोधाला फडणवीस यांनी केराचीच टोपली दाखवली आहे. विधानपरीषद निवडणूक 2024 मध्ये नव्याने सत्तेत आल्यानंतर आणि महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी हाच खाक्या कायम ठेवला. पण, संतोष देशमूख हत्या प्रकरण त्यांना भोवले. अखेर या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा त्यांना राजीनामा घ्यावा लागला.
- नैतिकतेच्या कारणामुळे हा राजीनामा आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याचा भ्रष्टाचार किंवा नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा घेणे हे कोणत्याही सरकारच्या दृष्टीने प्रतिमेस धक्काच असतो. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा घ्यायला प्रचंड उशीर केला. अधिकदा तर ते हा राजीनामा घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घ्यायला हवा, असेच सांगत राहिले. परिणामी राज्य सरकारीच प्रतिमा प्रचंड मलीन झाली. अखेर त्यांनी राजीनामा घेतलाच. हे सरकार आघाडीचे आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तिन पक्ष सहभागी आहेत. त्यामुळे आता इतर कोणत्याही पक्षाचा मंत्री यांचे कथीत भ्रष्टाचार, हत्या किंवा इतर कोणत्याही प्रकरणात नाव आले तर त्यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचार करावा लागणार आहे. इतकेच नव्हे तर त्यातून सरकारमध्ये पक्षसंघर्षही वाढीस लागणार आहे. त्यामुळे हा राजीनामा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक धक्काच असल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा, Minister Dhananjay Munde Resigns: अखेर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा; सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणामुळे वाढला होता दबाव)
उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी आहे आणि ज्यांच्या राजीनाम्यामुळे अवघ्या सरकारलाच धक्का बसला आहे ते धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे म्हणजे निकटवर्तीय आहेत. निकटवर्तीय व्यक्तीचा राजीनामा घ्यावा लागणे हे त्यांना पक्ष आणि राज्यकारभार चालविताना चांगलेच अडचणीचे ठरणार आहे. शिवाय, हाच राजीनामा त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून जर सुरुवातीलाच घेतला असता, त्यासाठी वेळकाढूपणा केला नसता तर, पक्षाला नैतिकतेचा टेंभा तरी मिरवता आला असता. पण, अजित पवार यांनी संतोष देशमुख प्रकरणात पक्षाची येथेच्छ बदनामी झाल्यानंतरच हा राजीनामा घेतला. त्यामुळे हा राजीनामा म्हणजे अजित पवार यांना उशीरा सूचलेले शहानपण! असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)