सरकारी जमीन हडपल्या प्रकरणी अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती
धनंजय मुंडे यांच्यावर अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील जमीन बेकायदेशीर रित्या हस्तांतरित करण्याचा आरोप आहे
महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाने आज (14 जून) मोठा दिलासा दिला आहे. सरकरी जमीन हडपण्याच्या प्रयत्न प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे धनंजय मुंडे यांची अटक टळली आहे. धनंजय मुंडे अडकणार? सरकारी जमीन हडपल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
धनंजय मुंडे यांच्यावर अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील जमीन बेकायदेशीर रित्या हस्तांतरित करण्याचा आरोप आहे. सदर जमीन ही देवस्थानची असल्याचा दावा वादीतर्फे करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता गुन्हे दाखल केल्याचं सांगत या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
आज या प्रकरणावर सुनावणी झाली. असे असताना पोलिसांनी पहाटेच बर्दापूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली. या प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. सोबतच बर्दापूर पोलीस गुन्ह्यालाही स्थगिती दिली आहे.