Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकार कमी पडले काय? देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
हा निकाल आला त्या दिवशी काही भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहून सर्वसामान्यांमध्ये एक उद्रेक होता. तोच उद्रेक भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियेतून बाहेर पडला.
मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारला जबाबदार धरले. यावर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच विचारले असता या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळत त्यांनी उत्तराला बगल दिली. भारतीय जनता पक्ष मराठा समाजासोबत आहे. त्यामुळे आता कोण बरोबर, कोण चुकीचे, कोण कमी पडले यावर खल करण्यापेक्षा या पुढे काय करता येईल यावर विचार व्हायला हवा अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक आहे. हा निकाल आला त्या दिवशी काही भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहून सर्वसामान्यांमध्ये एक उद्रेक होता. तोच उद्रेक भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियेतून बाहेर पडला. मी सांगू इच्छितो की, आता सर्व गोष्टी बाजूला ठेऊन मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे बाजू कशी मांडता येईल, यावर विचार व्हायला हवा, असे फडणीस म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्या दिवशी काही भाजप नेत्यांनी मराठा समाजासाठी हा काळा दिवस आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास कमी पडले, अशी प्रतिक्रिया दिली होती. (हेही वाचा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; रावसाहेब दानवे, अमित देशमुख यांच्या घराबाहेर आंदोलन)
मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कोणी करावे या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, काही लोक छत्रपतींच्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू, हा प्रयत्न तडीस जाणार नाही. छत्रपती घरानं हे एकच आहे. मराठा समाजाचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावे की संभाजी राजे यांनी करावे या मुद्दाच नाही. दोन्ही नेते आहेत. आपापल्या परीने चांगले काम करत आहेत.