निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टात जामीन मंजूर

त्यापैकी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र, त्यांच्या दुसऱ्या मागणीबाबत कोर्टाने काय निर्णय दिला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

Devendra Fadnavis | (Photo Credits-Facebook)

विधानससभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूर सत्र न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्यावर असलेल्या दोन फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याबाबतच्या खटल्याची सुनावणी नागपूर सत्र न्यायालयात (Nagpur Court) होणार होती. या सुनावणीस हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याने देवेंद्र फडणवीस हे स्वत: न्यायालयात आले होते.

नागपूर कनिष्ठ न्यायालयाने सुनावणीदरम्यन देवेंद्र फडणवीस यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या इमारतीत देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या दाराने प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस येणार म्हणून सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पुढच्या दरवाजात उपस्थित होते. मात्र, त्यांना चकवा देत फडणवीस यांनी मागच्या दाराने न्यायाल परिसरात प्रवेश केल्याचे एबीपी माझाच्या प्रतिनिधीने वार्तांकनादरम्यान म्हटले आहे.

काय म्हणाले फडणवीस?

न्यायालयात जामीन मंजूर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, 'हे प्रकरण साधारण 1995 ते 98 च्या दरम्यान एक झोपडपट्टी काढण्याच्या संदर्भात आम्ही एक आंदोलन केले होते. त्या वेळी आमच्यावर काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या तक्रारी आता संपल्याही आहेत. परंतू, त्या गुन्ह्यांची माहिती निवडणुक पत्रात उल्लेख केला नाही असा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे. या आधी या प्रकरणातील खटला मी न्यायालयात जिंकाल आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार कनिष्ठ न्यायालयात हे प्रकरण पुन्हा सुनावणीस आले आहे. माझ्यावर कोणतीही वैयक्तिक केस नाही. मला विश्वास आहे की याही खटल्याचा निकाल माझ्या बाजूने लागेन. मला माहिती आहे. हे सगळे करण्यापाठीमागे कोण आहे. योग्य वेळी मी त्याचा खुलासा करेन. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याचा माझ्यावर आरोप होतो आहे. परंतू, माझ्या वकीलांनी त्या वेळी दिलेल्या माहितीनुसारच तयार करण्यात आले होते' असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले. (हेही वाच, देवेंद्र फडणवीस हाजीर हो...!; निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांचीमाहिती लपवल्याप्रकरणी नागपूर कोर्टासमोर हजेरी)

काय आहे प्रकरण?

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली. त्यांच्यावर दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची माहिती त्यांनी 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण जुने आहे. 1996 आणि 1998 मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागदत्रांसर्भात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यांचीच माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत खटला दाखल केला आहे.

दरम्यान, फडणवीस यांच्याविरील याचिका या आधी तत्कालीन जेएमएफसी न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली होती. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अॅड. उके यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. यावर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबादल करत या खटल्याची सुनावणी प्राथमिक (कनिष्ठ) न्यायालयाने पुन्हा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर या खटल्याची सुनावणी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या समक्ष 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु झाली आहे.