NCP On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले: राष्ट्रवादी काँग्रेस

तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत.

Devendra Fadnavis | (File Photo)

सचिन वाझे प्रकरणावरुन (Sachin Vaze Case) महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडणाऱ्या आणि आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले. तसेच, फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात नेमलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सात विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या वेतनावर दरमहा 7 लाख 70 हजार रुपये खर्च होत होते, असाही दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत.' (हेही वाचा, Anil Deshmukh On Param Bir Singh: न सांगता येण्यासारख्या चुका घडल्यानेच परम बीर सिंह यांच्यावर बदलीची कारवाई- अनिल देशमुख)

दुसऱ्या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे, 'देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात नेमलेल्या रास्वसंघाशी संबंधित सात विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या वेतनावर दरमहा ७,७०,००० रु खर्च होत होते.त्याहून महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज सरकारबाहेरील खासगी लोकांकडे देऊन त्यांनी सरकारी गोपनीयता धाब्यावर बसवली होती.'

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिला या निवास्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. ही गाडी मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीची असल्याचे पुढे आले. पुढे तर मनसुख हिरेन यांचाच गुढ मृत्यू झाला. या प्रकरणावरुन राज्यातील विरोधी पक्ष जोरदार आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर आवाज उठवलाच. परंतु, दिल्लीत जाऊनही एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य केले. आता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विरोधकांना प्रत्युत्तर दिले जात आहे.