पालघर: शिवसेनेने बेईमानी केली, वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवलं; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
तर, थेट शेतकरी आणि जनतेशीच प्रतारणा केली आहे, असेही देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर टीका करताना म्हणाले.
सत्तेसाठी शिवसेना (Shiv Sena) या थराला जाईल असे वाटल नव्हते. जनतेने शिवसेना-भाजप (Shiv Sena - BJP) युतीला जनमत दिले होते. परंतू, शिवसेनेने आमच्याशी बेईमानी केली, अशा शब्दांत विधान सभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. पालघर येथे पार पडलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. वर्गात पहिला आलेल्या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर बसविण्यात आले, असे देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरही टीका केली.
महाविकासआघाडी सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले या सरकारने शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र, ठाकरे सरकारला आपले अश्वासन पाळता आले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. पण, हा शब्द काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिवावर मुख्यमंत्री होईल, असा तो शब्द दिला होता काय? असा सवालही फडणवीस यांनी या वेळी विचारला. (हेही वाचा, 'संभाल के रखिये' संजय राऊत यांच्या फेसबूक पोस्टनंतर राजकीय चर्चांना उधाण)
सत्तेवर येण्यापूर्वी, सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करु, विनाअट कर्जमाफी अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात सरकार आले तेव्हा मात्र या घोषणा हवेतच विरल्या. महाविकासआघाडीच्या रुपात सत्तेत असलेल्या या तिन्ही पक्षांनी केवळ जनादेशाचा अपमानच केला नाही. तर, थेट शेतकरी आणि जनतेशीच प्रतारणा केली आहे, असेही देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर टीका करताना म्हणाले.