Coronavirus in India: 'शब-ए-बारात' तसेच 'हनुमान जयंती'ला घराबाहेर पडू नका; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

बुधवारी हनुमान जयंती आणि शब्द ए-बारात कार्यक्रम साजरे होणार आहेत. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने औषधी वनस्पतीसाठी पर्वत उचलून आणला होता. आज जनतेला वाचवण्यासाठी हनुमानासारखं पर्वत उचलण्याची गरज नाही. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबून हनुमान जयंती साजरी करा, असं हटके आवाहन अजित पवारांनी जनतेला केलं आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credits : Facebook)

Coronavirus in India: शब-ए-बारात (Shab-e-Barat) तसेच हनुमान जयंतीला (Hanuman Jayanti) घराबाहेर पडू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Chief Minister Ajit Pawar) यांनी नागरिकांना केलं आहे. बुधवारी हनुमान जयंती आणि शब्द ए-बारात कार्यक्रम साजरे होणार आहेत. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने औषधी वनस्पतीसाठी पर्वत उचलून आणला होता. आज जनतेला वाचवण्यासाठी हनुमानासारखं पर्वत उचलण्याची गरज नाही. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबून हनुमान जयंती साजरी करा, असं हटके आवाहन अजित पवारांनी जनतेला केलं आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण सर्वांनी कोरोनाचा संसर्ग टाळावा. बुधवारी हनुमान जयंती आणि शब-ए-बारातसाठी नागरिकांनी घरा बाहेर पडू नये. घरातचं पूजा, अर्चा, प्रार्थना करा, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्रात आणखी 150 नवे रुग्ण आढळले; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1018 वर)

नागरिकांनी घराबाहेर न पडता कोणच्याही संपर्कात येऊ नये. तसेच पुढील सुचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्यक्रम घरातचं करावेत, असंही अजित पवारांनी सांगितले आहेत. यावेळी अजित पवार यांनी नागरिकांना आरोग्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच लॉकडाऊन दरम्यान कोणीही सरकारच्या सुचनांचे उल्लंघन करू नये, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रात 150 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 1018 वर पोहचली आहे. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. याशिवाय आज देशात गेल्या 24 तासांत 508 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भारतातील कोरोना बाधितांची संख्या 4789 झाली आहे. यातील 4312 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 353 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात कोरोनामुळे 124 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.