'औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करा' मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी
दरम्यान, मनसेने पक्षाच्या झेंड्यासह आपल्या विचारधारेत बदल करत हिंदुत्वाच्या वाटेवर चालणार असल्याचे स्षट केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे (Maharashtra Navnirman Sena) 23 जानेवारी रोजी राज्यव्यापी पहिले अधिवेशन पार पडले. दरम्यान, मनसेने पक्षाच्या झेंड्यासह आपल्या विचारधारेत बदल करून हिंदुत्वाच्या वाटेवर चालणार असल्याचे स्षट केले. त्यानंतर पाकिस्तान आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात मनसेने आवाज उठवत महामोर्चा काढला होता. यातच मनसेचे आमदार राजू पाटील (Raju patil) यांनी नवा मुद्दा उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर (Sambhaji Nagar) करा, अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे. तसेच नामकरणासाठी राज्यशासनाला भाग पाडू, अशा विश्वासही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना या मुद्द्यावर लढत आहे. आता हा मुद्दा मनसेने आपल्या हाती घेतल्याचे चिन्ह दिसत आहेत.
मनसेने हिदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यापासून आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात मनसेने 9 फेब्रुवारी रोजी महामोर्चा काढला होता. या मोर्चाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली होती. या मुद्दा गरम असताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नवा मुद्दा हाती घेतला आहे. नुकतीच मनसेची मंगळवारी औरंगाबाद येथे बैठक पार पडली. त्यावेळी राजू पाटील म्हणाले की, "मागील बऱ्याच काळापासून केंद्रात आणि राज्यातही शिवसेना सत्तेत होती. मात्र, या नामांतरणावरुन केवळ राजकारण करण्यात आले. कुठलाही आवाज उठवला नाही किंवा ठोस भूमिका घेतली नाही. जिल्ह्याचे नाव बदलायला केंद्राकडून मंजूरी लागते. मात्र, तशी मागणी राज्य शासनाने केली पाहिजे. यावेळेस शिवसेनेकडून लोकांना काहीच अपेक्षा नाहीत. मात्र मनसे राज्य सरकारला जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर असे करण्यास भाग पाडणार आहे," असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र राज्य सरकार कर्मचार्यांसाठी 29 फेब्रुवारीपासून होणार 5 दिवसांचा आठवडा; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मनसेने आपल्या झेंड्यात आणि भुमिकेत बदल केल्यापासून अनेक राजकीय नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गावर चालत आहेत, अशी मनसे समर्थक बोलत आहेत. एवढेच नव्हेतर, मनसेच्या नव्या भुमिकेचा शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी हात मिळवणी केल्यापासून शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला आहे, अशी चर्चा रंगली होती. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. शिवसेना कधीच हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.