मुंबईमधील 'Karachi Sweets' चे नाव बदलण्याची मागणी निरर्थक, ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही- Sanjay Raut

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत (Mumbai) शिवसेनेचे (Shivsena) नेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaokar) आणि राज ठाकरे यांचा पक्ष मनसेने, कराची स्वीट्सच्या (karachi Sweets) मालकाला दुकानातील नावामधून 'कराची' हा शब्द काढून टाकण्याचा इशारा दिला होता.

Shiv Sena MP Sanjay Raut | (File Photo)

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत (Mumbai) शिवसेनेचे (Shivsena) नेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaokar) आणि राज ठाकरे यांचा पक्ष मनसेने, कराची स्वीट्सच्या (karachi Sweets) मालकाला दुकानातील नावामधून 'कराची' हा शब्द काढून टाकण्याचा इशारा दिला होता. नितीन नांदगावकर दुकानदाराला आपल्या दुकानाचे नाव बदलायला सांगतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर कराची मिठाईच्या मालकाने दुकानाचे नाव कागदाने झाकले आहे. सध्या राज्यात या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. आता याबाबत शिवेसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही’, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

वांद्रे पश्चिमस्थित कराची स्वीट्सच्या मालकाला धमकावताना नांदगावकर यांनी दुकानातील नाव बदलले पाहिजे असे सांगितले होते. नांदगावकर म्हणाले होते की, 'कराची' हे नाव पाकिस्तानशी संबंधित आहे आणि ते मुंबईत वापरले जाणार नाही. पाकिस्तान हा दहशतवाद्यांनी भरलेला देश आहे. हे नाव बदलण्यासाठी त्यांनी मालक काही वेळही देऊ केला होता, परंतु लवकरात लवकर नाव बदलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले होते.

आता नांदगावकर यांच्या भूमिकेबाबत संजय राऊत यांनी आपले विचार मांडले आहेत. ते म्हणतात, ‘कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबई सह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही.’ अशा प्रकारे संजय राऊत हे कराची बेकारीच्या समर्थनात उतरले आहेत. (हेही वाचा: मुंबई: 'Karachi Sweets' ने शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्या मागणीनंतर दुकानाचं नाव वृत्तपत्रानं झाकलं)

याबाबत दुकानाच्या मालकाचे म्हणणे आहे की, हे नाव त्यांच्या कुटुंबामध्ये आहे कारण त्यांचे पूर्वज कराचीचे होते. नांदगावकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी शिवसेना नेत्यावर टीका करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, भारतामध्ये जशी कराची बेकरी लोकप्रिय आहे, तशीच पाकिस्तानच्या हैदराबाद शहरात बॉम्बे बेकरी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराचीपासून 100 कि.मी. अंतरावर असलेल्या हैदराबाद शहरातील बॉम्बे बेकरीचे केक आणि बिस्किटे पाकिस्तानमध्ये लोकप्रिय आहेत. सध्या भारतामध्ये हैदराबाद, पुणे, बेंगळुरू अशा अनेक शहरांमध्ये कराची बेकरीच्या अनेक शाखा आहेत.