दिल्ली: शिवसेना-NCP-काँग्रेस आघाडी सरकार स्थापनेवर एकमत, सत्तावाटपाचा निर्णय मुंबईत कळवणार: पृथ्वीराज चव्हाण

ही सर्व माहिती महाराष्ट्रातच केली जाईल,असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan with Nawab Malik | (Photo Credits: ANI)

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी (Sena-NCP-Congress Alliance) सरकारस्थापन्यासंबंधी सर्व मुद्द्यांवर NCP आणि Congress पक्षाची सविस्तर बैठक झाली. किमान समान कार्यक्रम आणि इतर सर्व मुद्द्यांवर आम्हा मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर मुंबई येथे काँग्रेस (Congress) - राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आघाडीसोबत असलेल्या इतरही मित्रपक्षांसोबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करण्यात येईल आणि मगच महाराष्ट्रात पर्यायी सरकार अस्तित्वात येईल असा विश्वास काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्यांमध्ये दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीनंतर NCP प्रवक्ते नवाब मलीक (Nawab Malik) यांच्यासोबत पत्रकारांशी संवाद साधत असताना पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

या वेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दिल्लीत सुरु अलेली सर्व बोलणी संपली आहेत. आता यापुढे सर्व निर्णय महाराष्ट्रात घेण्यात येतील. शिवसेनेसोबत बोलण्यापूर्वी आमच्या मित्रपक्षांना (स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष आदी) यांच्यासोबत चर्चा करु. त्यांना विश्वासात घेऊ. त्यानंतरच शिवसेनेसोबत बोलणी करु.

दरम्यान, सत्तावाटपाबाबत विचारले असता, शिवसेना पक्षासोबत सविस्तर बोलणी केल्यानंतरच सत्तावाटपाबाबत प्रसारमाध्यमांना सांगण्यात येईल. ही सर्व माहिती महाराष्ट्रातच केली जाईल,असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. (हेही वाचा, शरद पवार यांचा 'पॉवर गेम'; महाराष्ट्रात अनेकांच्या दांड्या गुल, भलेभले चितपट, पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक राजकारणाला लगाम )

एएनआय ट्विट

शिवसेना-भाजप युतीत वितूष्ट निर्माण होऊन ही युती संपुष्टात आली. त्यामुळे 105 आमदार असणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पर्यायी सरकारसाठी प्रयत्न सुरु झाले. यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीवर होते. या तिन्ही पक्षांच्या वैचारिक भूमिका विचारात घेता त्यांच्यात टोकाचेच अंतर आहे. त्यामुळे सरकार स्थापन करायचे तर किमान समान कार्यक्रम असावा. तसेच, हे सरकार टिकण्याच्या दृष्टीने हालचाली करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांच्यात जोर-बैठका सुरु होत्या. अखेर सविस्तर चर्चा झाल्यानंतर तिन्ही पक्षांचे एकमत झाले. आणि सरकार स्थापनेच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात झाली.