Delhi HC on Puja Khedkar Case: 'पूजा खेडकर तिची उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला 'योग्य मंचा'समोर आव्हान देऊ शकते'; उच्च न्यायालयाचा निर्णय
युपीएससीला पूजा खेडकरने नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले
Delhi HC on Puja Khedkar Case: दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) बुधवारी माजी प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकरला (Puja Khedkar) उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी, योग्य मंचाकडे जाण्याची मुभा दिली. पूजा खेडकरने यूपीएससीकडून तिची उमेदवारी रद्द केल्याच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. खेडकर हिच्यावतीने ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी काम पाहिले. यावेळी जयसिंग यांनी नमूद केले की, पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करण्याचा आदेश अद्याप तिला देण्यात आलेला नाही. तिच्याकडे फक्त प्रेस रिलीज आहे.
त्यावर यूपीएससीचे प्रतिनिधीत्व करणारे नरेश कौशिक यांनी स्पष्ट केले की, खेडकरचा ठावठिकाणा माहीत नसल्यामुळे ही प्रेस रिलीझ जारी करण्यात आली. तिची उमेदवारी रद्द झाल्याची औपचारिक माहिती प्रेस रिलीझ म्हणून देण्यात आली. याआधी केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरला दोन दिवसांत तिची उमेदवारी रद्द करण्याचा आदेश दिला जाईल, अशी माहिती न्यायालयाला दिली आहे.
31 जुलै रोजी, यूपीएससीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले होते की, फसवणूक आणि बनावटगिरीचा आरोप असलेल्या पूजा खेडकरची तात्पुरती उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. युपीएससीला पूजा खेडकरने नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले त्यामुळे तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून काढून टाकले. युपीएससीने मुदतवाढ देऊनही, पूजा विहित वेळेत तिचे स्पष्टीकरण सादर करण्यात अयशस्वी ठरली. त्यानंतर यूपीएससीने कठोर कारवाईचा निर्णय घेतला. (हेही वाचा: IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरची उमेदवारी UPSC कडून रद्द, भविष्यात परीक्षा देण्यासही मनाई)
त्यानंतर यूपीएससीच्या या निर्णयाविरुद्ध पूजाने उच्च न्यायालयात धाव घेतली. आता पूजा खेडकरच्या याचिकेवर विचार करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला असला तरी, खंडपीठाने खेडकर हिला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) जाण्याची मुभा दिली. खेडकर हिने योग्य मंचाकडे जाणे, आणि लवकरच युपीएससीकडून पूजाला आदेशाची प्राप्त उपलब्ध करून देण्याचे निर्देश देत, न्यायालयाने याचिका निकाली काढली.