भाजपशी ‘युती’ जरूर आहे; पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना: उद्धव ठाकरे
एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू व शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला, याच निर्धाराने कामाला लागूया!
Shivsena 53rd Anniversary: ''भाजपशी ‘युती’ जरूर आहे; पण शिवसेना (Shiv Sena) ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू'', असे ठणकाऊन सांगतानाच ''शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला, याच निर्धाराने कामाला लागूया!'', असा स्पष्ट निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केला आहे. आज (19 जून 2019) शिवसेना आपला 53 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामना मध्ये वर्धापन दिनाचे औचित्य साधत लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे.
'शिवसेना! निर्धाराने पुढे जाईल' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ''शिवसेनाप्रमुखांनी प्रांतीय अस्मितेचा विचार मांडला तो देशाने स्वीकारला व हिंदुत्वाचे बीज टाकले तेही या भूमीत तरारले. हिंदुत्वाला देशभरात जाग आणण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे आणि देवळातल्या घंटा बडवण्यापुरते नव्हते. त्यांची भूमिका सर्वसमावेशक होती. राष्ट्रद्रोही, मग ते कोणत्याही धर्माचे असतील त्यांना या देशात थारा नाही हे त्यांचे हिंदुत्व. राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिमेची प्रेतयात्रा काढणाऱया आणि समान नागरी कायद्याची होळी करणाऱया जात्यंधांना या देशात थारा नाही, असे खणखणीतपणे सांगणारे, परिणामांची पर्वा न करता ही भूमिका पुढे नेणारे एकमेव हिंदुहृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे''. (हेही वाचा, Shiv Sena 53rd Anniversary: मराठी माणसांच्या हक्कासाठी झटणाऱ्या शिवसेना पक्षाच्या आतापर्यंतच्या प्रवासाच्या काही महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या)
याच लेखात उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, ''प्रश्न धर्माचा नसून, मनात दडलेल्या राष्ट्रद्रोही विषवल्लीचा आहे. देशात धर्म अनेक असू शकतील, पण राष्ट्रात घटना एक हवी आणि कायदे सर्वांना सारखेच हवेत. समानता विचारात हवी, आचारात हवी. रशियात वा अमेरिकेत मुसलमानांसाठी व अन्य धर्मासाठी स्वतंत्र कायदे आहेत काय? आणि नसल्यास तेथे गुर्मीची भाषा करण्याची हिंमत जात्यंध समाज दाखवतो काय, असा सवाल फक्त शिवसेनाप्रमुखच विचारू शकले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे; पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू व शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला, याच निर्धाराने कामाला लागूया!'', असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.