आगामी शैक्षणिक वर्षामध्ये दुसरी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर सुरू करण्याच्या सरकारचा मानस
सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ आता 7 ऐवजी 9 पर्यंत पुढे केल्यास त्यांना शिक्षणाची गोडी लागेल असे केसरकर म्हणाले आहेत.
आगामी शैक्षणिक वर्षापासून दुसरी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिल्या आहेत. मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी याबाबत सूचना केली होती. बदलत्या जीवनशैलीमध्ये पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेकजणांची शाळेत जाण्याची इच्छा नसते. यावर उपाय म्हणून शाळा सकाळी उशिरा असावी असं राज्यपालांनी सुचवलं आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन केली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर पुढे निर्णय घेतला जाईल असे शालेय मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.
पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू असणार आहे. सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ आता 7 ऐवजी 9 पर्यंत पुढे केल्यास त्यांना शिक्षणाची गोडी लागेल असे केसरकर म्हणाले आहेत. नक्की वाचा: Maharashtra: महाराष्ट्रात 800 शाळा बनावट, आतापर्यंत 100 शाळांवर केली कारवाई .
बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता बालवाडी ते दुसरीला ‘पूर्व प्राथमिक विभाग’ संबोधण्यात येणार आहे.