उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोनावर यशस्वीरित्या मात, सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून डिस्चार्ज मिळाल्याची दिली माहिती
त्यानंतर ते पूर्वीप्रमाणे आपल्या सर्वांसोबत कामावर रूजू होतील असेही सुप्रिया सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांसह नेत्यांमध्ये खळबळ उडाली. ७ दिवसांपूर्वी ही बातमी आपल्या कानावर आली होती. त्यावेळी त्यांना तात्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर उपचार घेऊन आज त्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी दादांनी कोरोनावर मात केली असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी प्रार्थना करणा-या जनतेचे आभार मानले आहेत.
सध्या अजित पवारांची प्रकृती उत्तम असून पुढील 7 दिवस ते घरात विलगीकरणात राहणार आहे. त्यानंतर ते पूर्वीप्रमाणे आपल्या सर्वांसोबत कामावर रूजू होतील असेही सुप्रिया सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
'दादांच्या आजारपणात विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते व जनतेने ते लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्या सर्वांचे मनापासुन आभार.आपणा सर्वांच्या सदिच्छा व शुभेच्छा तसेच रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफ यांचे प्रयत्न यांच्या जोरावर दादांनी कोरोनावर यशस्वी मात केली' असेही त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
आपण सर्वांनी दाखवलेले प्रेम, काळजी आमच्यासाठी अनमोल आहे असे त्यांनी या ट्विटमधून म्हटले आहे.