Saamana On Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या शिक्षेवर दैनिक 'सामना' संपादकीयातून सवाल; 'चोराला चोर म्हटलं! हा काय गुन्हा झाला?'

तसेच, 'चोराला चोर म्हटलं! हा काय गुन्हा झाला?' असा मथळा देत सवारच उपस्थित केला आहे.

Rahul Gandhi | (Photo Credit - File Image))

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत येथील एका कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. या शिक्षेमुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. मानहानीच्या खटल्यात इतकी मोठी शिक्षा होण्याचे भारतातील बहुदा हे पहिलेच आणि दुर्मिळ प्रकरण असावे. न्यायालयाचा निर्णय आणि त्यावर भारतीय जनता पक्षाने दिलेल्या प्रतिक्रिया, राजकारण यावरुन जोरदार टीका होत आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक 'सामना' (Saamana Editorial) संपादकीयातूनही राहुल गांधी यांच्या शिक्षेवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहेत. तसेच, 'चोराला चोर म्हटलं! हा काय गुन्हा झाला?' असा मथळा देत सवारच उपस्थित केला आहे.

सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा भ्याडपणा मोदी सरकारने दाखवला आहे. चोरांना चोर म्हणण्याचे धाडस राहुल गांधी यांनी दाखवल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कायदेशी कारवाईची मर्दुमकी दाखवली आहे. सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी कर्नाटकातल्या एका प्रचारसभेत विचारला होता. त्यामुळे ‘मोदीनामा’ची मानहानी झाली असे ठरवून गुजरातमधले एक वेगळेच मोदी सुरत न्यायालयात गेले. सुरतच्या न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधींना न्यायालयाने माफी मागून प्रकरण मिटवा असा पर्याय दिला. मात्र राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही आणि जामिनावर मुक्त होऊन सुरत न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याचा पर्याय स्वीकारला. (हेही वाचा, 'भारताच्या आवाजासाठी लढत आहे, कोणतीही किंमत मोजायला तयार'; खासदारकी रद्द झाल्यानंतर Rahul Gandhi यांची प्रतिक्रिया)

निकालानंतर राहुल गांधी असं म्हणाले की सत्य हाच माझा इश्वर आहे पण आजच्या युगात सत्य आणि ईश्वर अशा दोघांवर संकटांची तलवार लटकते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा काळ अमृतकाल आहे असं म्हटलं होतं. मात्र याच अमृतकाळात चोरांना चोर म्हटलं म्हणून शिक्षा ठोठावली गेली. चोरांना सजा मिळाली नाही. गौतम अदाणी व मोदी भाई-भाई, देश लुट कर खाई मलई अशा घोषणा संसदेत दणाणत आहेत. दोन आठवड्यांपासून संसद बंद पडली आहे. देश लुटणाऱ्या अदाणींवर कारवाईचे नाव नाही. पण चोरांना चोर म्हटले म्हणून राहुल गांधींवर न्यायालयाच्या खांद्यावरून सत्ताधारी पक्षाने गोळी झाडली आहे. याआधी बदनामीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याचे उदाहरण आपल्या देशात नाही, मात्र राहुल गांधी बदनामी प्रकरणातील खटल्याल अपवाद ठरले आहेत.

मोदी चोर आहेत असं राहुल गांधी म्हणाले होते, पण ते डरपोकही आहेत हे पुन्हा सिद्ध झाले. अर्थात जी गोष्ट देशाला सांगण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च आला असता ती गोष्ट गुजरातमधील सुरत न्यायालयाने देशभरात फुकटात पोहचवली. माध्यमांवर बंधने आहेत, पण सुरतच्या न्यायालयाने जणू काही ही बंधने हटवून मोदी खरे कोण आहेत? हेच देशाला दाखवले आहे. देशातला भ्रष्टाचार दडपण्यासाठी लोकशाही आणि न्यायय यंत्रणेची केलेली ही मुस्कटदाबी आहे, असे म्हणत दैनिक सामनातून 'मार्मिक' भाष्य करण्यात आल आहे.