Thane Dahi Handi News: 'गोविंदा' जोमदार, कामगिरी दमदार, आग आललेल्या घरात घुसून वाचवले महिलांचे प्राण; ठाणे येथील घटना

या दोघांनी ताबडतोब इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढून खिडकीची लोखंडी जाळी कापून दोन महिलांची सुटका केली. त्यानंतर घटनास्थळावरून ते तत्काळ निघून गेले. ज्यामुळे त्यांची नावे कळू शकली नाहीत.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Dahi Handi 2023: ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर (Mira Bhayandar News) येथील चंद्रेश परिसरात घराला लागलेल्या भीषण आगीत दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोन महिलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे ही उल्लेखनीय आणि मानवता दर्शवणारी कामगिरी दोन गोविंदांनी केली. हे गोविंदा (Govinda) एक दहीहंडी (Dahi Handi) संपवून दुसऱ्या दहीहंडीसाठी निघाले होते. दरम्यान त्यांना एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसली. उत्सुकतेपोठी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी चौकशी केली असता घराला आग लागल्याची त्यांना माहिती मिळाली. तसेच, आगीने वेढलेल्या घरात महिला आणि तिची मुलगी अडल्याचेही त्यांना समजले. ही माहिती समजताच दोन्ही गोविंदा सतर्क झाले. त्यांनी जीवाची बाजी लावत आगीतून त्या घरात धाव घेतली. दोघींनाही घरातून सुरक्षीतरित्या बाहेर काढले. महत्त्वाचे म्हणजे एखाद्या देवदूतासारखे आलेले हे दोघे जसे आले तसेच निघूनही गेले. त्यांची नावेही कोणाला कळली नाहीत. त्यामुळे हे दोघे देवदूतच बनून आले होते अशी भावना उपस्थितांमध्ये काही काळ निर्माण झाली होती.

अग्निशमन दलाचे अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले की, ही घटना मीरा-भाईंदर परिसरातील चंद्रेश परिसरात घडली. सर्वप्रथम ही आग इमारतीच्या मीटर रुममध्ये आग लागली आणि सर्वत्र धूर पसरला. ज्यामुळे या ठिकाणी आग लागल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली. काहीच वेळात असेही पुढे आले की, घरात दोन महिलाही अडकल्या आहेत. दरम्यान, मोटारसायकलवरून दहीहंडी कार्यक्रमासाठी जात असताना दोन गोविंदांना त्यांना इमारतीबाहेर गर्दी दिसली. या दोघांनी ताबडतोब इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढून खिडकीची लोखंडी जाळी कापून दोन महिलांची सुटका केली. त्यानंतर घटनास्थळावरून ते तत्काळ निघून गेले. ज्यामुळे त्यांची नावे कळू शकली नाहीत, , असे पाटील यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

गोविंदा हा दहीहंडी उत्सवातील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. जो गोविंदा पथक/ मंडळ म्हणून येतो. गोविंदा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तंदुरुस्त तरुणांचा समावेश असतो. जे जन्माष्टमी उत्सवाचा भाग म्हणून उंचावर लटकवलेली दहीहंडी मानवी मनोरे रचून फोडतात. हा क्षण अत्यंत थरारक असतो. दहीहंडी जेवढी उंच तेवढा थरार अधिक. उंचावरील दहीहंडी फोडण्यासाठी मनुष्यबळही तितक्याच मोठ्या प्रमाणावर लागते. आयोजकांकडून उंचच उंच दहीहंडीसाठी मोठ्या प्रमाणावर बक्षीसही जाहीर केले जाते. हे आयोजक खास करुन स्थानिक राजकारणी, राजकीय पक्ष, संघटना अथवा संस्था असतात. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा लागलेली असते.



संबंधित बातम्या