मुंबईतील दगडी चाळ होणार इतिहासजमा, म्हाडा उभारणार 40 मजली टॉवर

म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळ (MBRRB)अध्यक्ष विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी ही माहिती दिली आहे. यात दगडी चाळीतील 10 इमारतींचा समावेश आहे.

मुंबईतील दगडी चाळ होणार इतिहासजमा, म्हाडा उभारणार 40 मजली टॉवर
Dagdi Chawl (Photo Credits: YouTube)

मुंबईचा कुख्यात गुंड अरुण गवळी (ArunGawli) याची ओळख असलेली दगडी चाळ (Dagdi Chawl) आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. अरुण गवळीचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. या दगडी चाळीवर आता 40 मजल्यांचे टॉवर उभारले जाणार असल्याची माहिती म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळ (MBRRB)अध्यक्ष विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी ही माहिती दिली आहे. यात दगडी चाळीतील 10 इमारतींचा समावेश आहे.

प्राथमिक योजनेनुसार दगडी चाळीच्या जागी 40 मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मूळ भाडेकरुंसाठी घरं असतील आणि उर्वरित घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील. दगडी चाळीत एकूण 338 भाडेकरु असून अरुण गवळी संपत्तीचा मालक आहे. अरुण गवळीने पुनर्विकासासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठवला होता. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर म्हाडाकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला.हेदेखील वाचा- डॅडी अरुण गवळी झाले आजोबा! अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांना कन्यारत्नाचा लाभ

“सध्या एमबीआरआरबीला या प्रकल्पात किती घऱं मिळतील हे निश्चित नाही. इरादा पत्र हे फक्त पहिलं पाऊल आहे. नंतर यामध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे,” असं घोसाळकर यांनी सांगितलं आहे. 10 इमारतींमध्ये प्रत्येकी चार मजले असून यामधील दोन इमारती धोकादायक असल्याने आधीच पाडण्यात आल्या आहेत. यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्या मोकळ्या जागेत भाडेकरुंसाठी तात्पुरती राहण्याची सोय केली जाईल.

"पुनर्विकासासाठी लवकरच बिल्डरला ना हरकत प्रमाणपत्र दिलं जाईल. दरम्यान भाडेकरुंसाठी इरादा पत्र मंजूर झालं आहे. त्याआधी एमबीआरआरबी पात्र भाडेकरुंची यादी तयार करणार आहे," असंही घोसाळकर यांनी सांगितलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2021 05:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).