अरबी समुद्रात एकाच वेळी पवन, अम्फन अशा दोन चक्रीवादळाचा धोका; मुंबई, कोकणसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता

त्यानंत पुन्हा एकदा अरबी समुद्रात तशीच स्थिती निर्माण झाली आहे. वादळांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या मते एकाच वेळी दोन वादळं येणं ही अतिशय दुर्मिळ स्थिती आहे.

cyclone | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

मुंबई शहर आणि उर्वरीत महाराष्ट्रात पाऊस कोसळण्याचा अंदाज 'स्कायमेट' या खासगी वेधशाळेने वर्तवला आहे. खास करुन , मुंबई, पुणे, नाशिक भागात उद्या (गुरुवार, 5 नोव्हेंबर 2019) पाऊस कोसळे असे 'स्कायमेट' ने म्हटले आहे. दरम्यान, अरबी समुद्रातही पुन्हा एकदा चक्रीवादळ येण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासात अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळे येण्याची शक्यता आहे. पवन आणि अम्फन अशी या वादळांची नावे आहेत. दरम्यान, संभाव्य स्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्याचे समजते.

क्यार या महाचक्रिवादळाने नुकतेच तांडव केले होते. त्यानंत पुन्हा एकदा अरबी समुद्रात तशीच स्थिती निर्माण झाली आहे. वादळांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या मते एकाच वेळी दोन वादळं येणं ही अतिशय दुर्मिळ स्थिती आहे. भूतकाळावर नजर टाकता यंदा अरबी समुद्रात चार तर बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळे यंदा निर्माण झाली. दरम्यान, वर्षाखेरीस अरबी सुमद्रात आणखी दोन चक्रीवादळे निर्माण होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather: पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा)

प्रासारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पवन चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करेन. ते प्रथम उत्तर पश्चिम आणि त्यानंतर पश्चीम दिशेने हे वादळ पुढे सरकेन, असा आंदाज आहे. तर, अम्फन वादळ हे पूर्व-मध्य अरबी समुद्रात येण्याची शक्यता असून, या वादळाचा परिणाम मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण गुजरातच्या विविध भागांत पाहायला मिळू शकतो. वादळाचा परिणाम म्हणून येत्या 24 तासात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त केला जात आहे. वादळाच्या पार्श्वभूमिवर वारे वेगाने वाहण्याची शक्यता असू,न त्याचा वेग प्रति तास 40 ते 50 किलोमीटर इतका असू शकतो, असेही स्कायमेटने म्हटले आहे.