Cyclone Nisarga Update: निसर्ग चक्रीवादळ संकटाचा मुंबईवरील धोका टळला?; वाऱ्याचा वेगही मंदावला, पण पाऊस कायम

हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये (Arabian Sea) उत्तर-ईशान्य दिशेने सरकून पुढे

Mumbai's Marine Drive (Photo Credits: ANI)

गेले काही दिवस महाराष्ट्रात (Maharashtra) निसर्ग चक्रीवादळ (Cyclone Nisarga), त्याचा वेग, त्याचा मार्ग, त्यामुळे होणारे संभाव्य नुकसान अशा अनेक गोष्टींची चर्चा सुरु होती. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये (Arabian Sea) उत्तर-ईशान्य दिशेने सरकून पुढे उत्तर महाराष्ट्र व त्यास लागून दक्षिण गुजरात किनारपट्टी ओलांडणार होते. त्यानुसार आज दुपारी या वादळाने रायगड जिल्ह्यात धडक मारली. त्यानंतर अलिबाग येथे आपले दौद्र रूप दाखवून हे वादळ मुंबईच्या दिशेने कूच करणार होते. आता स्कायमेटच्या (Skymet Weather) उपाध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादळाचा मुंबईवर (Mumbai) असलेला धोका जवळजवळ संपुष्टात आला आहे.

महाराष्ट्रावर चालून आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने दुपारी रायगड जिल्ह्यात हजेरी लावली. यावेळी रत्नागिरी, अलिबाग किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस झाला. याचा परिणाम मुंबई, ठाणे भागात काही प्रमाणात दिसून आला. त्यानंतर या वादळाने अलिबाग ओलांडले, मात्र आता स्कायमेटच्या महेश पलावत (Mahesh Palawat) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळाचा मुंबईवरील धोका संपुष्टात आला आहे. आज रात्रीपर्यंत पाऊस सुरूच राहील, मात्र वाऱ्याचा वेग 50 किमी ताशी ओलांडू शकणार नाही.

यासोबतच या चक्रीवादळामुळे होणारा लॅन्डफॉलही संपला आहे, पुढील काही वेळात या वादळाची प्रक्रिया पूर्ण होईल असे महेश यांनी सांगितले आहे. तर अशाप्रकारे सुदैवाने मुंबई व आजूबाजूच्या परिसराला कोणताही धोका न पोहोचवता या वादळाने मुंबईकरांचा पिच्छा सोडला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही बरीच तयारी केली होती. मुंबई दक्षिण-पश्चिम, रायगड, पालघर, डहाणू किनारपट्टी परिसरात एनडीआरएफ जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. तसेच इतरही सुरक्षेचे उपाय योजलेले होते. (हेही वाचा: Cyclone Nisarga Effect: निसर्ग चक्रीवादळ चा हाहाकार! रायगड मध्ये इमारती वरचे पत्रे उडून गेले (WATCH VIDEO)

दरम्यान, 100 ते 120 किमी प्रति तास या वेगाने वादळाने रायगड येथे धडक दिली होती. या ठिकाणी वाऱ्यासह पावसाचा वेगही प्रचंड होता. अशावेळी अनेक घरांचे नुकसान झाले, घरांचे पत्रे उडून गेले, अनेक झाडे कोसळली. समुद्रातील लाटांची उंची पाहता हे वादळ तीव्र असेल अशी शंका व्यक्त केली गेली होती, मात्र तसेही काहीही घडले नाही.