SIR च्या नावाखाली मुंबईत सायबर फसवणूक, ज्येष्ठ नागरिकांची 30 लाखांहून अधिक रुपयांची लूट

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना बनावट लिंक आणि एपीके फाइल्सद्वारे लक्ष्य केले असून, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बतावणी करत फसवणूक करणाऱ्यांनी तिघांकडून मिळून ३० लाख रुपयांहून अधिक रक्कम लुबाडली आहे.

Fraud

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान सायबर गुन्हेगारांनी मुंबईतील रहिवाशांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. बनावट लिंक आणि घातक APK Files चा वापर करून फसवणूक करणाऱ्यांनी अनेकांची फसवणूक केल्याची प्रकरणे मुंबई पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

निवडणूक आयोग किंवा कोणतीही शासकीय यंत्रणा मतदार यादीतील दुरुस्तीसाठी फोन किंवा SMS द्वारे पैसे मागत नाही किंवा अनोळखी एपीके फाइल पाठवत नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या लिंक किंवा फाइल्स डाउनलोड करू नयेत आणि अशा प्रकारच्या संशयास्पद कॉल्सची तक्रार तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर क्राइम हेल्पलाइनवर नोंदवावी, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे. नक्की वाचा: Maharashtra SIR ची प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध; नाव कसं तपासाल? नाव गायब असल्यास काय कराल? 

बतावणी करून विश्वास संपादन

अनेक प्रकरणांमध्ये आरोपींनी स्वतःला निवडणूक आयोगाचे अधिकारी असल्याचे भासवले आणि पीडितांच्या मतदार नोंदींमध्ये त्रुटी आढळल्याचा दावा करत फसवणूक केली. अशा प्रकारे मुंबई पोलिसांकडे नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांनी मिळून ३० लाख रुपयांहून अधिक रक्कम लुबाडल्याचे समोर आले आहे.

निवृत्त बँक कर्मचाऱ्याची फसवणूक

एका प्रकरणात ६६ वर्षीय निवृत्त बँक कर्मचारी शैलेश पांडुरंग कुळकर्णी यांना २५ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाच्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने संपर्क साधला. आरोपीने त्यांच्या मतदार यादीतील तपशिलात त्रुटी आढळल्याचे सांगत ती दुरुस्त करण्यासाठी ५ रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना एक एपीके फाइल पाठवण्यात आली, ज्याद्वारे फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या खात्यातून ४.६५ लाख रुपये आणि त्यांच्या बहिणीच्या खात्यातून २.३६ लाख रुपये लंपास केल्याचा आरोप आहे.

चेंबूर रहिवाशाची 11 लाखांहून अधिक फसवणूक

दुसऱ्या एका प्रकरणात चेंबूर येथील 79 वर्षीय मंजेरी सुब्रमण्यम कृष्णमूर्ती यांना 1 ऑगस्ट रोजी फसवणूक करणाऱ्यांचा फोन आला. आरोपींनी त्यांच्या मतदार नोंदीत जुना पत्ता असल्याचा दावा केला आणि आपली टीम नागरिकांना एसआयआर फॉर्म भरण्यास मदत करत असल्याचे सांगत एक एपीके फाइल पाठवली. या फाइलद्वारे आरोपींनी त्यांची आर्थिक माहिती मिळवली आणि त्यांच्या बचत खात्याशी संलग्न असलेल्या क्रेडिट कार्डद्वारे 11.28 लाख रुपये काढल्याचा आरोप आहे.

निवृत्त डॉक्टरांचीही फसवणूक

अशाच स्वरूपाचे आणखी एक प्रकरण ट्रॉम्बे पोलिसांकडे नोंदवण्यात आले. बीएआरसीचे 77 वर्षीय निवृत्त डॉक्टर प्रताप बोंगिरवार यांना 30 जुलै रोजी फसवणूक करणाऱ्यांनी एक लिंक पाठवली आणि त्यांचे व त्यांच्या वडिलांचे नाव मतदार नोंदींशी जुळत नसल्याचा दावा केला. या सूचनांचे पालन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 6.71 लाख रुपये वळते करण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement