व्यावसायिकाला गंडा; फक्त Missed Calls देऊन लुटले तब्बल 1.86 कोटी

सायबर हल्ल्याद्वारे मुंबईमधील एका व्यवसायिकाला तब्बल 1.86 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

भारतातील सायबर हल्ल्यां (Cyberattack)चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतात तबल 4 लाख 36 हजारांहून अधिक सायबर हल्ले झाले आहेत. अजूनही PNB ची घटना ताजी आहे. असे असताना सायबर हल्ल्याद्वारे मुंबईमधील एका व्यवसायिकाला तब्बल 1.86 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. आश्चर्य वाटेल मात्र चोरट्यांनी हे कृत्य केले आहे मिस कॉलच्या आधारे. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर आता पोलीस या गोष्टीचा शोध घेत आहेत.

मुंबईमधील माहीम येथे हे शहा नामक व्यावसायिक राहतात. 27–27 डिसेंबर या कालावधीमध्ये रात्री 11 ते 2 या दरम्यान त्यांच्या फोनवर 6 मिस कॉल आले. त्यातील एका नंबरचा कोड +44 असा होता. हा कोड इंग्लंडचा असल्याने सकाळी उठल्यावर त्यांनी त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे सिम कार्ड चालत नसल्याचे (Deactivate) त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत चौकशी केली असता, त्यांच्या स्वतःच्या विनंतीवरून ते सिम बंद करण्यात आल्याचे त्यांना सांगितले गेले. त्त्यानंतर संशय आल्याने त्यांनी बँकेत चौकशी केली असता, त्यांच्या कंपनीच्या खात्यावरील 1.86 करोड रुपये गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही रक्कम विविध 14 खात्यांवर ट्रान्सफर झाली आहे. शहा यांचे बँकेचे खाते त्यांच्या मोबाईलशी जोडले गेले आहे, त्यामुळे चोरट्यांना हे कृत्य करणे शक्य झाले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शहा यांच्या सिमच्या युनिक नंबरमुळे ही चोरी झाली आहे. रात्री मिस कॉल देऊन चोरांनी शहा यांचा युनिक नंबर हॅक केला असावा. तसेच विश्वासार्ह नसणाऱ्या वेबसाईट किंवा अॅपवरून पैशांची देवाणघेवाण झाली असावी. त्यावेळी शहा यांचे बँकेचे डिटेल्स चोरले गेले असावेत, असाही पोलिसांना संशय आहे. काही दिवसांपूर्वी घाटकोपरमध्येही अशा प्रकारची घटना घडली होती. या व्यक्तीच्या खात्यातून चोरट्यांनी 50 लाख रुपये चोरले होते.