Mira Road: जेवणाचे बिल भरण्याचे कारण सांगून हॉटस्पॉटसाठी चक्क ग्राहकाने लंपास केला हॉटेलमालकाचाच मोबाईल

मिरारोड मधील एका हॉटेलात ऑनलाईन पेमेंट भरण्याच्या बहाण्याने एका ग्राहकाने चक्क हॉटेलमालकाचाच मोबाईल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Photo)

पेटीएम (Paytm), भीम (Bhim), फोन पे (Phone Pe) यांसारखे अॅपमुळे ऑनलाईन पेमेंट करणे आता अतिशय सोपे झाले आहे. त्यामुळे आपल्याला काही खरेदी करायचे असेल किंवा काही खायचे असेल तर खिशात पाकिट नसले तरीही आपले काम होते. त्यामुळे कुठे हॉटेलात जेवायला गेलात तर पाकिट नसले आणि तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप असले तरी तुम्ही भरपेट भोजन करु शकता. मात्र मिरारोड मधील एका हॉटेलात ऑनलाईन पेमेंट भरण्याच्या बहाण्याने एका ग्राहकाने चक्क हॉटेलमालकाचाच मोबाईल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आपल्या मोबाईल मधील नेटपॅक संपल्याचे सांगून हॉटस्पॉटसाठी ग्राहकाने बिल भरण्यासाठी हॉटेल मालकाचा मोबाईल घेतला आणि हॉटेल मालकाचा डोळा चुकवून हा ग्राहक त्याचा मोबाईल घेऊन चक्क पसार झाला. याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- केवळ एका कोडच्या आधारावर मिळणार तुमचा चोरीला गेलेला मोबाईल, केंद्र सरकारने तयार केला नवा डेटाबेस

हा ग्राहक मिरारोड येथील नवरत्न हॉटेलमध्ये जेवायला आला होता. जेवण झाल्यानंतर त्याला बिल ऑनलाइन द्यायचे होते. मात्र ग्राहकाचा नेटपॅक संपल्याने हॉटेलमधील वायफायचा नंबर मागितला. मात्र वायफायची सुविधा ग्राहकांसाठी नसल्याने ग्राहकाने हॉटेल व्यवस्थापकाचा मोबाइल हॉटस्पॉट वापरण्यासाठी घेतला होता. काही वेळाने हॉटेल मालक कामात व्यस्त झालेला पाहून ग्राहकाने त्याचा मोबाईल घेऊन तेथून पळ काढला.

मिरारोड पोलीस सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे त्या ग्राहकाचा शोध घेत आहेत.