कल्याण - विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रूळाला तडे , मध्य रेल्वेचा वेग मंदावला
मध्य रेल्वेची वाहतूक किमान 10-15 मिनिटं उशिरानं धावत आहे.
मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेवर (Central Railway) कल्याण - विठ्ठलवाडी मार्गावर (Kalyan - Vittalwadi) रेल्वे रूळाला तडे गेल्याने आज सकाळपासूनच मध्य रेल्वेचा वेग मंदावला आहे. सकाळी 6.15 वाजता मध्य रेल्वेच्या रूळाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने हा बिघाड दुरूस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली या दिशेकडे जाणार्या लोकल सेवांवर प्रामुख्याने परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेने तातडीने रेल्वे रूळ दुरूस्तीचे काम हाती घेतले असले तरीही सकाळी ऐन कामाच्या वेळेमध्ये हा बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आज मध्य रेल्वेची वाहतूक किमान 10-15 मिनिटं उशिरानं धावत आहे.
सोमवारी संध्याकाळच्या वेळेसही मध्य रेल्वेवर टिटवाळा-आंबिवली या मार्गावर सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता. रात्री प्रवास करणार्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्याचा त्रास झाला होता. त्यानंतर आज सकाळीही मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.