Covid-19 Vaccination: महाराष्ट्रात 19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात; शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून घेता येणार लस
30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ॲप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत
देशात जानेवारीपासून कोरोना विषाणूविरुद्ध लसीकरण (Covid-19 Vaccine) सुरु आहे. सुरुवातील जेष्ठ नागरिकांचे लसीकरण केले गेले, त्यानंतर 45 ते 60 वायोगातील लोकांचे लसीकरण सुरु केले. मे पासून देशात 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला लस घेण्याची परवानगी मिळाली. आता महाराष्ट्रामध्ये उद्यापासून, (19 जून) 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासह 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार 19 जून पासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ॲप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. (हेही वाचा: कोल्हापूरमध्ये कोरोना संसर्गाचा दर सर्वात जास्त; सिंधुदुर्गात ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक')
दुसरीकडे लहान मुलांनादेखील सिरम इन्स्टिट्यूटची नोवोवॅक्स लस ही दिली जाणार आहे. या लशीच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी दिली आहे. जुलैपासून ही ट्रायल सुरु होईल. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी, पाच महिन्यांत 50 लाखाहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे, म्हणजेच त्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार आतापर्यंत 53,72,219 लोकांना लसचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.