Covid 19 Vaccination: महाराष्ट्रात 19 जानेवारी पासून पुन्हा सुरू होणार कोविड 19 लसीकरण; जाणून घ्या केंद्राने राज्य निहाय दिलेल्या वेळापत्रकाची माहिती
महाराष्ट्रामध्ये कोविड 19 लसीकरणासाठी मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार हे चार दिवस निश्चित करण्यात आले आहेत.
भारतामध्ये 16 जानेवारी ला कोविड 19 लसीकरण (COVID 19 Vaccination) मोहिमेला सुरूवात झाली. मात्र कोविन सिस्टिमद्वारा (CoWIN System) लसीकरणासाठी नोंदणी होत असताना त्यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ठप्प असलेली महाराष्ट्रातील लसीकरण मोहिम आता उद्या 19 जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. या लसीकरणामध्ये कोविनमधील तांत्रिक बाबींची दखल केंद्राकडून घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. दरम्यान कालच केंद्र सरकारने राज्यनिहाय कोणत्या दिवशी कुठे लसीकरण मोहिम राबवली जाईल याची माहिती दिली आहे. त्याचं सविस्तर वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?
केंद्र सरकारच्या माहितीनुसार बहुतांशी राज्यात आठवड्याचे 4 दिवस लसीकरण केले जाईल. लसीकरणामुळे अन्य नियमित आरोग्य सेवांवर त्याचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून किंवा इतर रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून चार दिवस ठरवण्यात आले आहेत. महाराष्ट्रामध्ये मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार हे चार दिवस निश्चित करण्यात आले आहेत.
PIB Tweet
दरम्यान कोविन अॅप वरून माहिती भरताना, एसएमएस पाठवताना अडचण होत असल्याने महाराष्ट्राकडून ही माहिती केंद्राला कळवण्यात आली होती. आता ही तांत्रिक बाब दूर सारण्यात यश आलं आहे. दरम्यान खोळंबलेल्या 2 दिवसामुळे मुंबई मध्ये लसीकरण महिनाभर सुरू राहील अशी चर्चा होती पण राजेश टोपे यांनी येत्या 15 दिवसांमध्ये पहिला डोस घेणार्यांची संख्या पूर्ण करण्याचा मानस असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे.